
> विद्या कुलकर्णी
अस्सल हिंदुस्थानी सुभग पक्षी… याचे देखणे दर्शन खरंच ‘सुभग’ असते…
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातसुद्धा पहाटेच्या वेळी हळूहळू पक्ष्यांची हालचाल सुरू होते व बरेच रंगीबेरंगी पक्षी पाहावयास मिळू शकतात. शहरातही सहज दिसणाऱया पिवळ्या रंगाच्या सुभग पक्ष्याचे गोड गाणे कानावर पडले की त्यांना कॅमेरामध्ये कैद करण्याची उत्सुकता वाटते. त्यांच्या पिवळ्या रंगामुळे ते चटकन दिसतात. सुभग हे पक्षी उष्णकटिबंधीय हिंदुस्थानी उपमहाद्वीपमध्ये आढळतात. आकार आणि रंगावरून सुभग पक्ष्याच्या 4 उपजाती आहेत – Common Iora, Marshall’s Iora, Great Iora, Green Iora,. त्यापैकी हिंदुस्थानात मिळणारे सामान्य सुभग (Common Iora) व मार्शलचा सुभग (Marshall’s Iora ) पक्ष्यांची माहिती ह्या लेखात देत आहे.
सामान्य सुभग
नराचा वरील भाग हिरव्या रंगाचा असतो. डोळ्यांभोवती पिवळे कडे असून, पंख व शेपटी काळी असते. पंखांवर रुंद पट्टे असतात, तर खालील भाग पिवळा असतो. मादीला नरातील काळ्या रंगाऐवजी हिरवा रंग असतो. पंखांवर पांढरे पट्टे असून खालील भागावर हिरव्या रंगाच्या छटा असतात. नर मादीपेक्षा आकाराने मोठे असतात. या पक्ष्याचे पाय अशक्त असून चोच लांब असते. हे पक्षी अतिशय मधुर गातात. एकमेकांना साद घालताना मात्र हळू आवाजात पुटपुटतात. आपण त्यांच्या आवाजाची नक्कल केल्यास लगेचच प्रतिसाद देतात.
हे पक्षी झाडाझुडपात, पानगळीच्या विरळ जंगलात आढळतात. त्यांचे वास्तव्य बांबूमिश्रित वने, आमराई, काजूच्या बागा, आंबा, चिंच, कडुनिंब यांसारख्या झाडांवर व त्याचबरोबर शहरांमध्ये व खेडय़ांलगत असणाऱया गर्द झाडी, शेती परिसरातही असते.
हे पक्षी अतिशय उद्योगी असून लहान गटांमध्ये किंवा मिश्र कळपामध्ये झाडांवर कीटक शोधताना दिसतात. कीटकांशिवाय अळ्या, कीटकांची अंडी हेही त्यांचे खाद्य असते. फुलांमधील मधही त्यांना आवडतो.
सुभग पक्ष्याचा प्रजननाचा काळ एप्रिल ते जून असतो. नर 2 ते 4 मी. उंचीच्या झाडांवर प्रथम झाडाच्या काटक्यांपासून साचा बनवून गवताच्या साहाय्याने कपाच्या आकाराचे घरटे बांधतो. मादी एकावेळी 2-4 अंडी घालते. अंडी गुलाबी रंगाची असून त्यावर जांभळे-तपकिरी रंगाचे ठिपके असतात. नर-मादी मिळून पिलांचे संगोपन करतात. प्रजनन काळात नराची पाठ व डोके काळ्या रंगाचे होते, जणू काही डोक्यावर काळ्या रंगाची टोपीच घातली आहे. मादीला आकर्षित करण्यासाठी नर पक्षी हवेत उंच भरारी घेऊन शीळ घालत पंखांची उघडझाप करत खाली येतात. नर त्यांची पिसे पसरवतात व हवेमध्ये चक्राकार फिरवतात तेव्हा ते हिरव्या, काळ्या, पिवळ्या आणि पांढऱया चेंडूसारखे दिसतात. हे पक्षी पिसे टाकण्याची प्रक्रिया वर्षातून दोन वेळा करतात. यांच्या घरटय़ाला साप, सरडे, भारद्वाज व कावळा यांसारख्या पक्षी-प्राण्यांपासून धोका असतो.
मार्शलचा सुभग
हनुवटी व गळा सोनेरी पिवळा असून पाठ व पंखांवरील काळा रंग ऋतुमानाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात आढळतो. खालील भाग पिवळ्या रंगाचा असून शेपटी काळी-पांढरी असते. चोच सरळ, टोकेरी फिक्कट राखाडी रंगाची असते. नराची बुबुळं काळसर तर मादीची पिवळी व पाय राखाडी असतात. मादीची पाठ हिरव्या रंगाची व खालील बाजू पिवळ्या रंगाची असते. या पक्ष्यांचे ‘खाद्य, प्रजनन व राहणीमान’ सामान्य सुभग पक्ष्याप्रमाणेच असते.
शहरात सहजपणे दिसणाऱया सुभग पक्ष्यांचे फोटो मी मात्र हिमालयात जाऊन काढले आहेत. हिमालयातील दाट जंगलात उंच झाडांवरून त्यांना शोधून काढणे केवळ त्यांच्या मधुर गाण्यामुळे आणि तेजस्वी रंगांमुळेच शक्य झाले.




























































