‘जीएसटी’ 21व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

894

देशात आर्थिक सुधारणा घडविण्यासाठी मोदी सरकारने आणलेला जीएसटी हा 21व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा असल्याचे सांगत भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला बुधवारी घरचा आहेर दिला. यावेळी काँग्रेसचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या सुधारणांमुळे त्यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले जावे अशी शिफारसही स्वामी यांनी केली.

प्रज्ञा भारतीच्या एका कार्यक्रमात बोलताना स्वामी यांनी भाजपवरच टीकांचा भडीमार केला. ते म्हणाले की, देशाने 8 टक्के विकासदर गाठला आहे खरा, पण काँग्रेसने पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात केलेल्या सुधारणा पुढे नेण्यात आल्या नाहीत. यामुळे आपण 3.7 टक्के दर कसा गाठू शकणार? यासाठी एकीकडे भ्रष्टाचाराशी मुकाबला करण्याची आवश्यकता आहे आणि दुसरीकडे गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे. अशा स्थितीत जीएसटीसारख्या अडथळ्यांनी व्यापारी घाबरले आहेत.

जीएसटीचे ज्ञानच नाही
मुळात जीएसटी एवढी किचकट आहे की त्याबाबत कुणालाच नीट कळलेले नाही. जीएसटीसाठी नेमका कोणता फॉर्म भरायचा, कॉम्प्युटरवर तो कसा अपलोड करायचा हेही कुणाला माहीत नाही, असेही ते म्हणाले. हिंदुस्थानला जगात महाशक्ती म्हणून वर यायचे असेल तर पुढील 10 वर्षांत देशाने 10 टक्के दराने आर्थिक विकास करायला हवा, असे मतही स्वामी यांनी यावेळी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या