अनुदानित शाळेतील कर्मचाऱयांना बालसंगोपन रजा, शिक्षण समितीच्या बैठकीत आज होणार निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुदानित शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना आता 180 दिवसांची बाल संगोपन रजा मिळणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग अपत्याच्या संगोपनासाठी 730 दिवसांची विशेष रजाही मिळणार आहे. तब्बल तीन वर्षांनी हा निर्णय होणार आहे. काही अटींच्या पूर्ततेसह पुरुष कर्मचाऱयांनाही रजा मिळू शकणार आहे. उद्या, सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार आहे.

मुंबईत 49 अनुदानित माध्यमिक शाळा असून त्यासह दोन अध्यापक महाविद्यालयातील कर्मचाऱयांना ही रजा मिळणार आहे. त्याचबरोबर या 180 दिवसांच्या बाल संगोपन रजेबरोबरच दिव्यांग अपत्याच्या संगोपनासाठी कर्मचाऱयाला संपूर्ण सेवाकाळात 730 दिवसांची विशेष बाल संगोपन रजाही मिळणार आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये कर्मचाऱयांना बाल संगोपन रजा देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र अनुदानित शाळांमधील कर्मचाऱयांची ही रजा शाळा संहितेत समाविष्ट करण्यात आली नव्हती. सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

अशा आहेत अटी

  • पहिल्या दोन बालकांच्या संगोपनासाठी ही रजा मिळणार असून मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत ही 180 दिवसांची रजा घेता येणार आहे.
  •  त्यासाठी महापालिकेच्या माध्यमिक विभागातील सेवेत एक वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे.
  •  एका वर्षात जास्तीत जास्त दोन महिन्यांची रजा घेता येणार आहे. रजेवर जाण्यापूर्वी जेवढे वेतन मिळत होते तेवढे वेतन रजा काळात मिळणार आहे.
  • ही रजा हक्क म्हणून मागता येणार नसून सक्षम प्राधिकाऱयांच्या पूर्वपरवानगीनेच रजा घेता येणार आहे.
  • पुरुष कर्मचाऱयांना पत्नी जेवढय़ा कालावधीसाठी अंथरुणाला खिळलेली आहे अथवा पत्नी मनोरुग्ण असल्यामुळे जेवढय़ा कालावधीसाठी बाल संगोपन करण्यास असमर्थ आहे तेवढय़ा काळासाठी 180 दिवसांची रजा मिळणार आहे.