राज्य कामगार विमा योजनेतील कामगारांच्या वारसा हक्क, घरांबाबतची बैठक यशस्वी

राज्य कामगार विमा योजनेतील कामगारांना वारसाहक्क, मालकीहक्काने घरे देण्याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त यांच्यात झालेली बैठक यशस्वी झाली. दरम्यान, लवकरच याबाबत ठोस तोडगा काढण्यात येणार आहे, असेही विमा आयुक्तांनी स्पष्ट केले.

विमा योजना रुग्णालयातील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांविषयी राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सफाई कामगारांना लाड-पागे समिती नियमानुसार वारसा हक्क देणे, त्यांना मालकी हक्काने घरे देणे यावर चर्चा झाली. यावेळी विमा आयुक्तांनी लाड-पागे समिती नियमांची अंमलबजावणी राज्य विमा योजना कार्यालय व त्यांच्या अखत्यारित येणाऱया रुग्णालयांत काटेकोरपणे केली जाईल, असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. बैठकीला अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदभाई परमार, मुंबई सचिव जितू रोझ, मुंबई उपाध्यक्ष नवीनचंद्र मकवाना, बाळा सावर्डेकर आदी उपस्थित होते.

कुचराई करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई होणार

रुग्णालयातील तीन कामगारांना लाड-पागे समिती शासन आदेशात नसताना तीन अपत्याच्या नावाखाली कामावरून कमी केले होते, याविषयी बैठकीत चर्चा झाली. आयुक्तांना शासन निर्णयातील तरतुदींचे शासन निर्णयातील तरतुदी निदर्शनाला आणून दिल्या. यावर तत्काळ सकारात्मक निर्णय घेऊन या तीन कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे आदेश देत याबाबत कुचराई करणाऱया अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.