
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमध्ये पुन्हा एक नवा वाद उफाळून आलाय. याला कारण ठरले सुधीर मुनगंटीवार यांचे एक वक्तव्य. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूर मतदारसंघात जावे लागले. तोपर्यंत मुनगंटीवार हे सलग तीनदा चंद्रपुरातून निवडून आले होते. चंद्रपूर मतदारसंघात सध्या भाजपचेच किशोर जोरगेवार हे आमदार आहेत. मात्र 2027 ला नव्याने पुनर्रचना झाल्यावर मी चंद्रपुरात परत येईन, अशी घोषणाच मुनगंटीवार यांनी केल्याने भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे. असे झाले तर जोरगेवार कुठे जातील, असा प्रश्न निर्माण झालाय. मी पुन्हा येईन, असे फडणवीस म्हणाले होते, याची आठवण मुनगंटीवार यांनी करून देतानाच माझे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून, त्यानंतर चंद्रपूरच्या विकासाचा झंझावात निरंतर राहील, असेही मुनगंटीवार म्हणाले.





























































