
राज्यात यंदा साखर उत्पादनात मोठी घट होणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत सर्वच खासगी आणि सहकारी साखर कारखाने सुरू होणे अपेक्षित होते. मात्र सध्या 69 सहकारी आणि 58 खासगी अशा केवळ 127 कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होत असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी याच काळात 31 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते, तर यंदा केवळ साडेआठ लाख मेट्रिक टन एवढे कमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आधी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटलेले असतानाच राज्यातील पुरामुळे असलेल्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होऊ लागला आहे. 2018-19 या वर्षातील ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर रोजी चालू झाला होता. त्यानुसार अखेरपर्यंत सुमारे 176 साखर कारखान्यांनी तब्बल 1 हजार 50 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत 110 लाख मेट्रिक टन एवढय़ा विक्रमी साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र यंदा ऊसच कमी असल्याने सर्व कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच ज्या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहेत ते पुढील तीन-चार महिनेच चालू शकणार आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन अर्ध्यावर येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
साखरेचा उतारा घटला
मागील वर्षी गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात राज्यातील साखरेचा उतारा 10.24 टक्के होता. त्यामुळे साखरेचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले होते, मात्र यंदा साखरेच्या उताऱयाचे प्रमाण घटले असून 9.42 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होत आहे.




























































