ऊस, हळद, आले तरारले! पिकांचा भाव चांगलाच वधारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊस, हळद व आले या पिकांचा चांगलाच भाव वधारल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजारामध्ये या शेतमालाला नेहमीच उठाव असतो. शेतीपिकामधील अव्वल पीक मानले गेलेले उस, तर दुसऱ्या क्रमांकाचे हळद आणि तिसऱ्या क्रमांकावर आले पीक आहे.

मानांकन मिळालेली हळदही यावर्षी चांगलीच ‘गोरी’ झाली आहे. आले पिकाची 13 ते 16 हजारांच्या दरम्यान वाटचाल सुरु असल्याने या तिन्ही पिकांमध्ये यावर्षी कोण अव्वल राहणार ? याची चर्चा शेतकरी वर्गामध्ये रंगू लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाचे क्षेत्र मोठे असून सध्या उसाचीच चलती आहे. कारण ऊसाला चांगला दर मिळतो आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळाल्यानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होते.

ऊसाला दर मिळाल्याने ऊस उत्पादक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्टयात बहुसंख्य साखर कारखान्यांनी साधारणपणे 2500 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत पहिल्या हप्त्या दर निघाला आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ऊस दराच्या बाबतीत ऊस उत्पादक आंनदात आहेत. हळदीच्या उत्पादनालाही चांगला दर मिळतो आहे. या हळदीला जागतिक बाजारपेठेत मानांकन मिळाले असून या पिकाची लागवड घटल्याने तिचा दरही चांगलाच वाढण्याची शक्यता आहे.

आले आहे फॉर्मात
दोन वर्षापूर्वी आल्याला 25 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. त्यावेळी आले बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. आल्याला बाजारपेठेत चांगला भाव मिळाल्यामुळे गतवर्षी त्याची लागणही मोठ्या प्रमाणावर झाली पण, अतिवृष्टीने सारेच श्रम वाया जातील की काय ? अशी शंका येत असतानाच आता मात्र, आले हळू हळू फॉर्मात येऊ लागले आहे.