
आसावरी जोशी, [email protected]
ज्येष्ठ आणि कसदार अभिनेत्री सुहास जोशी… पाच वर्षांनी छोटय़ा पडद्यावर मध्यवर्ती भूमिकेत खणखणीत पुनरागमन करीत आहेत… अभिनय.. कलाकार, नाटक, चित्रपट… मालिका… अभ्यास… चिंतन… मंथन.. अशा त्यांच्याबरोबर मारलेल्या विविधरंगी गप्पा…
भाषा… कोणतीही भाषा… या लेखापुरतं आपण केवळ मराठी भाषेपुरतंच बोलूया. भाषा आपल्या संस्कृतीचे प्रतीक… संस्कारांचे द्योतक… माणसाला… समाजाला सुसंस्कृत, समृद्ध करण्याचे काम भाषा करीत असते. आपण जे बोलतो… उच्चारतो… लिहितो… थोडक्यात, भाषेचा ज्या पद्धतीने वापर करतो, उच्चार करतो त्यातून आपले व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृतता प्रतीत होते.
रंगभूमी, चित्रपट, आजच्या रोज प्रसारित होणाऱया मालिका आणि प्रत्येकाच्या मोबाईलचा आत्मा असलेली समाजमाध्यमे यातून भाषेचा प्रसार सर्वाधिक होत असतो. आपण अनुकरणप्रिय माणसं या सगळय़ा माध्यमांचे मोठय़ा आवडीने आणि हौसेने अनुकरण करतो. परिधान… वर्तणूक… बोलणे… आणि… आणि सर्वात महत्त्वाची भाषा. कशी असते आजच्या मालिकांची, नाटकांची, चित्रपटांची पर्यायाने समाजमाध्यमांची भाषा… थोडीशी उदाहरणे पाहूया…
तू असं बोलायला नको हवं होतंस.
मला साडी घालायला आवडते.
ज्याम भारी वाटतंय यार!
सिंह, नरसिंह या शब्दांचा उच्चार खरे पाहता ‘व’ ला ‘ह’ जोडून आहे, पण हा ‘व’ ओलांडून या नावांचा, विशेषणांचा शब्दशः उच्चार केला जातो.
हे सर्व उच्चार करणारे… पल्लेदार संवाद याच भाषेत बोलणारे आपलेच मराठी कलाकार… मला त्यांच्यावर अजिबात टीका करायची नाही. पण या गुणी कलाकारांनी जर थोडा वेळ काढून भाषेकडेही तितकेच लक्ष दिले तर सादर होणारी कलाकृती अधिक समृद्ध आणि दर्जेदार होईल.
या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ कलावतीचे नाव मला सर्वप्रथम केवळ त्यांच्या उच्चारासाठीच घ्यावेसे वाटते. ठाशीव… सुस्पष्ट व शुद्ध उच्चार त्यांच्या परिपक्व अभिनयाची सखोलता आणि गांभीर्य अधिकच वाढवतात. विलक्षण बोलके डोळे… अभिनयाचा अस्पष्ट भावही क्षणात दाखवून देणारा भावपूर्ण चेहरा… दिग्गजांच्या तालमीत तावून-सुलाखून सोन्याप्रमाणे झळाळणारा अभिनय… आणि या सर्वांना सुसंस्कृततेची, अभ्यासाची, चिंतनाची झळाळी देणारी त्यांची भाषा… शुद्ध… स्पष्ट… ठसठशीत…
सुहास जोशी. रंगभूमीचा संस्कार अंगोपांग भिनवून त्या प्रत्येक माध्यमात स्वतःचा ठसा उमटवत राहिल्या. आज त्या पाच वर्षांनंतर छोटय़ा पडद्यावर मोठय़ा दिमाखात पुनरागमन करीत आहेत. स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या मालिकेमधून. मी वाट पाहात होते अशाच मोक्याची… सुहासताईंसारख्या ज्येष्ठ, गुणी अभिनेत्रीला ‘फुलोरा’च्या पहिल्या पानावर मुख्य लेखासाठी आणण्याची… सुहासताईही अगदी आनंदाने सरसावल्या ‘फुलोरा’च्या वाचकांशी गप्पा मारायला…
पाच वर्षांनंतर…
पाच वर्षांच्या अंतरावर बोलताना सुहासताई म्हणाल्या की, पाच वर्षे म्हणजे फार नाही काही… एक नाटक केले ‘वुमनिया’… त्यानंतर मुलाकडे अमेरिकेला गेले. प्रत्यक्ष येथे काम करत नसले तरी मनात सतत रंगभूमी, अभिनय असतोच. आता या मालिकेबाबत सुचित्रा आणि आदेश बांदेकरांनी विचारणा केल्यावर मी हो म्हटले. कारण मला कल्पना आवडली. कथा छान आहे, मध्यवर्ती भूमिका आहे… मला आटोक्यात काम करायला आवडतं. आम्ही पूर्वीचे कलाकार एकच नाटक किंवा चित्रपट किंवा मालिका हातात घेऊन त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करायचो. त्यामुळे आमच्या व्यक्तिरेखेला, कामाला पूर्ण न्याय देता यायचा. कामाचा अभ्यास, लागणारे वाचन, मनन, चिंतन करता यायचे. पण एकावेळी दोन ठिकाणी काम करायला लागले की मग कुठेच धड लक्ष देता येत नाही. त्यामुळे मोजके काम हाती घेऊन मला त्याला पूर्ण न्याय द्यायला आवडते.
रंगभूमी हा श्वास असणाऱया सुहास जोशी आजच्या नाटकांवर भाष्य करताना म्हणाल्या की, आजची तरुण मंडळी काम उत्तमच करताहेत. त्याबाबत प्रश्नच नाही. चिन्मय मांडलेकर, ऋषिकेश जोशी, मुक्ता बर्वे हे तरुण कलावंत चांगलेच काम करीत आहेत. पण त्याचबरोबर आज नाटक आठ दिवसांत रंगभूमीवर येते ही जरा खटकण्यासारखी गोष्ट आहे. पूर्वी नाटकाच्या तालमी तीन-तीन महिने चालायच्या. या तालमी म्हणजेच खरा अभ्यास असतो. कलावंत येथेच खरा घडत असतो.
प्रेक्षकांना सकस त्रास आवडतो
मुळात प्रेक्षकांची नस ओळखता आली पाहिजे. आज प्रेक्षकांना मनोरंजन हवे आहे. म्हणून केवळ सवंग विनोद त्यांना देणे हा मला प्रेक्षकांवरच मोठा अन्याय वाटतो. सुहासताईंनी ‘बॅरिस्टर’चा अनुभव सांगितला. एक गृहस्थ हे नाटक पाहायला सतत यायचे. जयवंत दळवींचे ‘बॅरिस्टर’ हे गंभीर प्रकृतीचे नाटक. त्यांना ते नाटक पाहून त्रासही व्हायचा. त्यांना विचारलं की तुम्ही वारंवार हे नाटक पाहण्यासाठी का येता…? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की अहो या त्रासातून आमच्या बुद्धीला खाद्य मिळते. हा त्रास आम्हाला हवाहवासा वाटतो. याचाच अर्थ प्रेक्षकांना केवळ हास्यरस नकोय. तर विचारांना, बुद्धीला चालना देणारं दिलेलं आवडतं…
येथे सुहासताई सांगतात की, अभिनय हा नवरसांनी युक्त असतो. आज केवळ हास्यरस आणि बीभत्स रसाचीच पुनरावृत्ती का व्हावी… इतर रसही प्रेक्षकांना दिले तर त्यांना नक्कीच आवडतील.
मातब्बर दिग्दर्शक
विजया मेहता, सई परांजपे या मातब्बर दिग्दर्शिकांविषयी सांगताना सुहासताई सहजच त्या काळात शिरल्या. अल्काझींनी कधी दिसण्याला, चेहऱयाला महत्त्व दिले नाही. चेहरा कसाही असो त्यातून व्यक्त होणारा अभिनय महत्त्वाचा… विजयाबाई, सई म्हणजे आमच्या अक्षरशः रिंगमास्टर होत्या. अगदी सहज त्या आम्हाला व्यक्तिरेखेत सोडून द्यायच्या… आणि मग त्यात मनसोक्त विहार मात्र आम्ही करायचा. सुहासताईंनी सांगितलेला प्रसंग खरोखरच मनःस्पर्शी होता.
‘बॅरिस्टर’ नाटकात नायिका राधाचं केशवपन केलं जातं. नाभिक तिचे केस हातात घेऊन बाहेर येतो. बॅरिस्टर त्याच्या अंगावर धावून जातो. खूप गंभीर प्रसंग. तरीही विजयाबाईंना काहीतरी अपूर्ण वाटत होतं. त्या सारखं म्हणत होत्या, ‘काहीतरी घाणेरडं पाहिजे गं इथे’ आणि त्यांना कल्पना सुचली. त्याच्या हातातले केस रंगमंचावर पडलेले दाखवायचे. त्या एका कृतीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
येथे सुहासताई म्हणाल्या की, ही आंतरिकता आजच्या नाटकांमध्ये यायला हवी.
काळाची गरज
आज मालिका निर्मिती होणे ही काळाची गरज आहे. कारण त्यातून अक्षरशः अनेकांचे पोट भरते. त्यांना रोजगार मिळतो. फक्त दिग्दर्शकांनी लेखकाने आणि महत्त्वाचे म्हणजे कलावंतांनी आपल्या अभ्यासाला वेळ दिला पाहिजे. आज संपूर्ण जगच वेगवान झाले आहे. कोणालाच थांबायला वेळ नाही. पण त्या वेगासोबत आपल्याला राहायलाच हवे. पण साथीला अभ्यास, वाचन, चिंतन या गोष्टी घेऊनच.
वाणीचे संस्कार
सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे शुद्ध, स्पष्ट उच्चार हे सुहासताईंचे वैशिष्टय़. त्याविषयी त्या सांगतात की, येथे पुन्हा अल्काझींचे संस्कारच कामी आले. नाटकाची किंवा कोणत्याही कलाकृतीची भाषा सगळ्यात महत्त्वाची असते. हे आम्हाला त्यांनीच शिकवले. शिवाय घरातले संस्कार होतेच. शाळेत, महाविद्यालयात संस्कृत विषय अभ्यासाला होता. संस्कृतचा वाणीवर एक वेगळाच प्रभाव पडतो. आज उत्तम मराठी लिहिणारे लेखक मराठीत कमी आहेत. त्यांनी भाषेचा अभ्यास करायला हवा.
७२ वर्षांची ही चिरतरुणी, सुहासिनी आपल्या फिटनेसविषयी हसत हसत सांगते. मी घरात भरपूर काम करते. तेथेच माझा व्यायाम होतो. घरात काढलेल्या लोण्यात त्यांच्या सौंदर्याचे रहस्य आहे. विविध प्रकारचे पदार्थ खायला आणि करून मित्रमंडळींना खिलविणे ही त्यांची विशेष आवड. नवीन मुलांना अभिनय शिकवायला खूप आवडतो. पण त्यांनीही तितकाच रस घ्यायला हवा.
गप्पा खरोखरच खूप रंगल्या. लेखनमर्यादेमुळे थांबावं लागतंय. पण अभ्यास, मनन, चिंतन या गोष्टी खरंच आजचे कलाकार खूप गांभीर्याने घेतात…? प्रश्नच आहे. सुहासताईंनी एक शब्द वापरला, विचार घुसळले गेले पाहिजेत. ते फक्त ढवळले जात आहेत. खरंच जेव्हा ही मंथनाची अर्थात घुसळण्याची प्रक्रिया घडेल तेव्हा आपले मूळचेच समृद्ध असलेले प्रत्येक माध्यम या विचारमंथनाने अधिक झळाळून उठेल… परिपूर्ण होईल.
रंगभूमी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती, हिंदी चित्रपट… प्रत्येक माध्यमात सुहासताईंचा अभिनय त्या प्रसंगातील अगदी बारीकसारीक रेषही उठावदारपणे दाखविणारा. ‘बॅरिस्टर’ आणि ‘सख्खे शेजारी’. दिग्गज दिग्दर्शिकांची दोन टोकाच्या भूमिका असणारी नाटके. पण दोघांची प्रकृती सुहासताईंनी अगदी लीलया पेलली.


























































