
सामना प्रतिनिधी । नांदेड
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय छावा संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पंजाबराव धोंडीबा काळे (३८) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी समयसूचकता दाखवून लगेच त्याला ताब्यात घेतले.
दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत अखिल भारतीय छावा संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पंजाबराव धोंडीबा काळे तेथे आले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करुन त्यांनी तेथे भाषणही केले आणि लगेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढले. तेथे त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले व आरडाओरडा सुरू केला.
काडी पेटवण्या अगोदरच पोलिसांनी चपळाईने त्यांना ताब्यात घेतले. यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. असंख्य मराठा बांधव त्या ठिकाणी जमा झाले. आणि त्यांनीही घोषणाबाजीला प्रारंभ केला. पोलिसांची जागा कुमक मागविण्यात आली. काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना वजिराबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
































































