
सामना प्रतिनिधी । मालवण
मसुरे उसलाटवाडी येथील नंदन मोहन मुणगेकर वय- २४ या युवकाने काल रात्री मसुरे- बांदिवडे पुलावरून खाडीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शनिवारी सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या दरम्यान पुलानजीकच्या पाण्यात ग्रामस्थांना आढळून आला. तालुक्यात गेल्या दोन दिवसात घडलेली ही तिसरी आत्महत्या असून यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान नंदन याचा खाडीपात्रात शोध घेण्यास गेलेल्या येथील स्कूबा डायव्हर्सच्या पथकाला अपयश आले. अखेर हा मृतदेह सायंकाळी पाण्यावर आल्याचे दिसून आले.
मसुरे उसलाटवाडी येथील नंदन मुणगेकर हा मानसिक रुग्ण असून गेले वर्षभर त्याच्यावर उपचार सुरू होते. काल रात्री आईबरोबर भांडण झाल्यानंतर तो बांदिवडे पुलावर गेला होता. साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ते पुलावरून खाडीपात्रात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच मसुरे पोलीस दूरक्षेत्रचे एस. बी. नांदोसकर, रूपेश गुरव, नितीन शेडगे हे सकाळी घटनास्थळी दाखल झाले. नंदन याला चांगले पोहता येत होते. त्यामुळे त्याने पाणी उडी मारली असावी त्यानंतर पोहत किनारा गाठत तेथून तो अन्य ठिकाणी गेला असण्याची शक्यताही ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यादृष्टीनेही पोलिसांनी तपास केला. त्याचा भ्रमणध्वनीही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे खाडीपात्रात त्याचा शोध घेण्यासाठी मालवण येथील स्कूबा डायव्हिंगच्या पथकास पाचारण करण्यात आले. दुपारी दाखल झालेल्या स्कूबा डायव्हर्सनी खाडीपात्रात त्याचा बराचवेळ शोध घेतला मात्र त्यांना तो सापडला नाही. अखेर पावणे चार वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृतदेह पुलानजीकच्या पाण्यात तरंगताना स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. नंदन याच्यामागे आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.
तालुक्यातील खाडीपात्रात आत्महत्यांचे सत्र सुरू असून गेल्या दोन दिवसात तीन जणांनी कालावल तसेच कर्लीखाडीत आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या आत्महत्यांच्या घटनांमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
































































