
>> सुजाता बाबर
[email protected]
नेपच्यूनचा सर्वात मोठा उपग्रह ट्रायटन आपल्या ग्रहाच्या फिरण्याच्या उलट दिशेने परिभ्रमण करतो. या परस्परसंवादाने नेपच्यूनच्या अक्षावर परिणाम होत अखेरीस नेपच्यूनचा अक्ष सुमारे 28 अंशांनी झुकला आहे. सौरमालेच्या विशालतेत एक उपग्रह संपूर्ण ग्रहाचा अक्ष बदलू शकतो.
सौरमालेच्या अतिदूर टोकावर जिथे सूर्यप्रकाश फक्त मंद झळाळी स्वरूपात पोहोचतो आणि तापमान उणे 200 अंश सेल्सियसपर्यंत घसरते, तिथे नेपच्यून हा ग्रह स्थित आहे. पृथ्वीपेक्षा जवळ जवळ 30 पट अधिक अंतरावर असलेला हा निळसर, थंड बर्फाळ महाग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तब्बल 165 पृथ्वी वर्षे घेतो. इतक्या दूर असूनही नेपच्यून शांत नाही. सौरमालेतील सर्वात वेगवान वारे या ग्रहावर वाहतात. येथे त्याचा एक अत्यंत विचित्र उपग्रहही आहे. आता संशोधकांना वाटते की, हाच उपग्रह नेपच्यूनच्या अक्षाला कलता धक्का देण्यास कारणीभूत ठरला असावा.
सौरमालेतील बुध आणि गुरू ग्रह वगळता प्रत्येक ग्रह काही ना काही प्रमाणात झुकलेला आहे. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23 अंश झुकलेला असल्यामुळे ऋतू निर्माण होतात. युरेनस हा तर 98 अंशांनी झुकलेला असून तो जणू बाजूवर एका फुटबॉलसारखा घरंगळत फिरतो असे दिसते. मात्र नेपच्यूनचा अक्ष 28 अंशांनी झुकलेला आहे आणि ही बाब अनेक वर्षांपासून संशोधकांसाठी कोडे ठरली होती. युरेनसप्रमाणे नेपच्यूनला एखाद्या प्रचंड धडकेचा स्पष्ट पुरावा नाही. मग हा ग्रह नेमका इतका झुकला कसा? या प्रश्नाचे उत्तर नेपच्यूनच्या विचित्र उपग्रहात दडलेले असावे असे नवीन संशोधन सुचवते.
साओ पावलो राज्य विद्यापीठातील संशोधक रॉडनी गोमेस यांनी मांडलेल्या संशोधनानुसार नेपच्यूनचा सर्वात मोठा उपग्रह ट्रायटन हा या बदलासाठी जबाबदार असू शकतो. ट्रायटन हा सौरमालेतील अत्यंत विलक्षण उपग्रह मानला जातो. तो आपल्या ग्रहाच्या फिरण्याच्या उलट दिशेने परिभ्रमण करतो. याला प्रतिगामी कक्षा असे म्हणतात. सौरमालेतील मोठय़ा उपग्रहांमध्ये ही वैशिष्टय़पूर्ण बाब फक्त ट्रायटनमध्येच दिसते. त्यामुळे संशोधकांना वाटते की, ट्रायटनचा जन्म नेपच्यूनभोवती झाला नसून तो क्यूपर पट्टय़ातील एखादा बटु ग्रह असावा. क्यूपर पट्टा म्हणजे नेपच्यूनच्या पलीकडे असलेला बर्फाळ वस्तूंचा प्रदेश! सौरमालेच्या सुरुवातीच्या काळात नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणाने ट्रायटनला आपल्या कक्षेत ओढून घेतले असावे. ही घटना सौम्य नसावी. ट्रायटन सुरुवातीला अत्यंत लांबट आणि झुकलेल्या कक्षेत फिरत असावा. कालांतराने गुरुत्वाकर्षणीय परिणामांमुळे त्याची कक्षा बदलत गेली. या प्रक्रियेत ट्रायटन आणि नेपच्यून यांच्यातील गुरुत्वीय परस्परसंवाद म्हणजेच प्रभाव वाढत गेला. हाच परस्परसंवाद नेपच्यूनच्या अक्षावर परिणाम करू लागला.
संशोधनानुसार ट्रायटनच्या या हळूहळू बदलणाऱया कक्षेमुळे नेपच्यूनचा फिरण्याचा अक्ष सौरमालेतील एस-8 नावाच्या विशिष्ट वारंवारतेच्या अनुनादात आला. साध्या भाषेत सांगायचे तर फिरणाऱया भोवऱयाला हलकेच धक्का दिल्यास तो हळूहळू कलतो, त्याप्रमाणे ट्रायटनने नेपच्यूनच्या अक्षाला धक्का दिला. ही प्रक्रिया लाखो वर्षे चालली आणि अखेरीस नेपच्यूनचा अक्ष सुमारे 28 अंशांनी झुकला.
या संशोधनासाठी केलेल्या संगणकीय अनुकरणांमध्ये विविध शक्यता तपासण्यात आल्या. अनेक अनुकरणांमध्ये नेपच्यूनचा अक्ष 20 अंशांपेक्षा अधिक झुकलेला दिसून आला. यावरून ट्रायटनचा नेपच्यूनवर मोठा प्रभाव पडू शकतो असे स्पष्ट होते.
ट्रायटनची कहाणी इथेच संपत नाही. सध्या तो नेपच्यूनच्या खूप जवळ आहे आणि गुरुत्वीय परिणामांमुळे तो अजूनही हळूहळू ग्रहाकडे सरकत आहे. संशोधकांच्या अंदाजानुसार सुमारे 3.6 अब्ज वर्षांनंतर ट्रायटन नेपच्यूनच्या रोश मर्यादेत प्रवेश करेल. त्या वेळी तो तुकडे होऊन विखुरेल किंवा थेट नेपच्यूनवर आदळेल. जर तो तुकडे झाला तर नेपच्यूनभोवती नवीन आणि भव्य कडय़ांची प्रणाली तयार होऊ शकते.
सध्या मात्र ट्रायटन शांतपणे आपल्या ग्रहाभोवती फिरत आहे. हा पकडलेला प्रवासी अजूनही नेपच्यूनवर आपली छाप सोडत आहे. जर हे संशोधन बरोबर ठरले तर ट्रायटन हा केवळ नेपच्यूनचा उपग्रह नाही, तर त्या ग्रहाच्या इतिहासाला दिशा देणारा महत्त्वाचा घटक ठरतो. सौरमालेच्या विशालतेत एक उपग्रह संपूर्ण ग्रहाचा अक्ष बदलू शकतो, ही कल्पनाच विश्वातील गुरुत्वीय शक्तींची विलक्षण ताकद दाखवून देते.
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)




























































