सुवर्णस्पर्श

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. विजया वाड[email protected]

सुकन्या कुलकर्णी… आविष्कारचे ठाशीव संस्कार घेऊन आज आपल्या अभिनयाचा ठसा अगदी प्रत्येक क्षेत्रात उमटवते आहे… तिच्या  बहुरंगी अभिनयाविषयी .

चंद्रशाळा! 1982 मध्ये 10-12 वर्षांच्या 75 मुलींनी आणि थोडय़ा मुलांनीही गजबजलेलं उत्साहाचं गाव. गुरू पार्वतीकुमार, सुलभा-अरविंद देशपांडे ही आता इतिहासाची सोनेरी पानं. तेव्हा मुलांत दंग असायची. दादा, मावशी, नि पप्पा! मुलांची आवडती माणसं. तिथे एक नृत्य नाटय़ तयार होत होते. माधव साखरदांडे लिखित ‘दुर्गा झाली गौरी’ त्यात माझी निशू (निशिगंधा वाड) विदूषकाचे काम करी तर सुकन्या माळीण होई. शर्वरी मुंगी, किशोरी माळीण, यतीन राजा नि संध्या पुरेचा दुर्गा. मी नि माझ्यासमोर या चिमण्यांचे पालक छबिलदासच्या हॉलच्या बाहेर तासन्तास उभे असू. त्यात शिल्पासाठी उभे प्रमोद नवलकरही असतं. सुकन्याचे (कुलकर्णी) किशोरी (शहाणे) चे बाबा असत. मी, शोभा बोंद्रे, श्री. आणि सौ. पाटणकर आमची गँग गप्पांचा फड जमवी. तिथे फक्त माया नि मैत्रीचा खजाना होता. मुलींची प्रॅक्टिस संपली की छबिलदास गल्लीतल्या फेमस श्रीकृष्ण बटाटेवडेवाल्याचे आम्ही ‘भले’ करीत असू मोठी मौज होती. त्यातली पाणीदार डोळय़ांची नि सरल नासिकेची सुकन्या ही सुवर्णकन्या 23 डिसेंबर 2018 ला अर्धशतकी सलामी आयुष्यास देत आहे.

सुकन्या कुलकर्णी सध्या ‘माई’ म्हणून घराघरात लोकांच्या मनावर राज्य करीत आहे. आजी कशी असावी? प्रेमळ, कर्तव्यदक्ष, कर्मनिष्ठ नि प्रसंगी कठोरही. घरासाठी. आईच्या वयात ती आजीची भूमिका करीत आहे. पडद्यावरले वय हल्ली इतके कमी होत आहे की आश्चर्याने थक्क व्हावे. पण धिटाईने भूमिका स्वीकारणे आणि ती वकुबाने करणे सुकन्यास इतके चांगले जमले आहे की पूछो मत! याआधी जेव्हा अल्फा मराठीवर ‘आभाळमाया’ ही मालिका आली तेव्हा पहिल्या प्रायव्हेट चॅनेलवर ‘नायिका’ म्हणून चमकण्याचा मानही सुकन्यालाच मिळाला होता. विनय आपटे या गुणी नट-दिग्दर्शकाने हे सोन्याचे पान तिच्या मुकुटात खोचले होते. अत्यंत निर्मळ चेहरा, डोळय़ातून भावना व्यक्त करण्याचे कसब, अगदी कमी शब्दांत आंगिक अभिनयाने व्यक्त होण्याचे कौशल्य ही सारी ‘आविष्कार’च्या भट्टीत तयार झालेल्या कलाकारांची खासियत. पण राजे हो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भूमिकाही तशाच कसदार मिळाव्या लागतात. त्या सुकन्यास मिळाल्या हे तिचे महद्भाग्य आणि त्या तिने रसिकांच्या काळजावर कोरल्या हे तिचे कौशल्य नि आपले सौभाग्य! प्रेक्षकांनी सुकन्यास भरभरून प्रेम दिले आहे.

अनेक फिल्मफेअर पुरस्कारांची मानकरी सुकन्या ज्युलिया या गोड मुलीची आई आहे. मनमिळावू अन् डोक्यात इवलीशीही हवा न गेलेली ही अभिनेत्री 25 डिसेंबरला आपला आनंदोत्सव साजरा करीत आहे. वीर सावरकर सभागृहात नाकात नथ घातलेला तिचा सुंदरसा फोटो लक्ष वेधून घेतो. तिचं निमंत्रणही मोठं अगत्याचं. मी मग आमंत्रणास आशीर्वादाचा संदेश पाठवला. ‘अभिनंदन बेटा खूप अभिमान वाटतो तुझा. तुझी विजयामावशी.’ त्यावर लगेच उत्तर आले, ‘ये नक्की. तर मला जास्त आनंद होईल.’ असा जिव्हाळा. असे प्रेम.

मुली कलाक्षेत्रात गेल्या तर बिघडतात असा जो समज पूर्वी प्रचलित होता तो सुकन्या, किशोरी, निशिगंधा, मृणाल अशा समकालीन अभिनेत्रींनी खोटा ठरविला आहे. व्यवस्थित लग्न… संसार… मुलंबाळं नि तरीही करीयर यशस्वी, लखलखीत नि तेजस्वी इतका आनंद आनंद वाटतो ना! मावशी मावशी करीत भेटतात, गळा लागतात पोरी तेव्हा लहानग्या होत्या ते दिवस परत उजळतात.

दोन आठवणी आपल्याशी शेअर करायला आवडेल. या मुली दिल्लीला प्रयोग करायला चालल्या होत्या. ‘दुर्गा झाली गौरी’चा दहा-बारा वर्षांच्या पोरी इतक्या दूर निघाल्या म्हणून पालक रडत होते. ‘जपून राहा. भांडू नका. वेळेवर खा, प्या. सुलूमावशीला, दादांना त्रास देऊ नका.’ आमचा आपण सूचनांचा लोगो इतक्या पालकांना दिल्लीला नेणे सुलूमावशीला कसे बरे शक्य व्हावे? ‘‘मी घेईन त्यांची काळजी. तुम्ही सगळी निवांत घरी जा.’’ शेवटी सुलभाताईंनी आम्हाला जाण्याची सूचना केली. गुरू पार्वती कुमारांनी एक भला मोठ्ठा डबा भरून काकडय़ा सोलून नि मीठ लावून आणल्या होत्या. मुली खुशाल आमच्याकडे न बघता काकडय़ा खात होत्या. शेवटी दिल्ली ट्रीप यशस्वी करून अगदी पार्लमेंटवाल्या लोकांसमोर शो करून मुली अभिमानाने परतल्या तेव्हा मी निशूला विचारले,

‘‘झालं ना गं सारं व्यवस्थित?’’ ‘‘हो. पण मी, किशोरी, सुकन्यानं काही मुलींना झोपेत पेनानं मिशा काढल्या ना! त्यामुळे मावशी ओरडली.’’ ‘‘हा काय गं द्वाडपणा?’’ मी म्हटलं. ‘‘नंतर ओल्या फडक्यानं मावशीनं आम्हालाच त्या पुसायला लावल्या तेव्हा कुठे शांत झाली सुलूमावशी.’’

‘रोडास’मध्ये (हिरानंदानी, पवई येथील गॅलेरिया समोरचे एक अतिश्रीमंत हॉटेल) पार्टी होती. सिनेसृष्टीपेक्षाही मालिकासृष्टी श्रीमंत! रोज की कमाई ना! घरोघरी कलाकारांना पोचविण्याचा रतिब.

दुपारी घराची बेल वाजली. सुकन्या होती. आम्ही ‘रोडास’च्या समोरच्या ‘सरकारी’ इमारतीत राहतो. ‘अगं मावशी, इतक्या जवळ आले होते, म्हटलं तुला भेटल्याशिवाय जायचं नाही.’ ‘‘किती छान वाटलं सुकन्या. काय करू खायला?’’ ‘‘नको गं. तिथे खाणंच खाणं असेल. मी एवढस्सं खाल्लं तरी अंगी लागतं गं मावशी.। आता फोटोत बसवणार नं आम्हाला म्हणून पार्टीय. मावशी, थोडं वाटेल वाईट दोन-चार दिवस. पण अगं चांगल्या कलाकाराला भय नसतं. एक संपला तर दुसरा रोल मिळतोच मिळतो. तुला तर निशूमुळे सगळंच व्यवस्थित माहितीय. पण सकाळी 9 ते रात्री 9 सगळे एकत्र असतो ना! मग एक ‘मालिका कुटुंब’च तयार होतं बघ. त्यामुळे थोडा दुःखभरा सीन होणारच. चल, मला छानशी कॉफी कर. मग मी निघते.’’

‘‘तू सुखात आहेस ना बाळ?’’… ‘‘अगदी सुखात मावशी.’’ कॉफी पिऊन जितक्या सहज आली तितक्या सहज अंतर्धान पावली. ‘ईश्वर’मध्ये (दाक्षिणात्य चित्रपट होता तो) वयाच्या सोळाव्या वर्षी आलेली सुकन्या आता केवढी प्रगल्भ झाली होती. तो चित्रपट आख्ख्या चंद्रशाळेने कौतुकाने पाहिला होता.  ‘आपली मुलगी’ म्हणून! मग लाइफलाइन, शांती, गाजल्या तिच्या मालिका. ‘‘मावशी, मला कुठलंही काम सांग. मी निवेदन करू का गं?’ हा साधेपणा, प्रेमळ आविष्कार मनास खोलवर स्पर्शून जातो नि मग सुकन्या ‘माणूस’ म्हणून अधिकच आवडून जाते.

सुकन्या, ही विजया मावशी चंद्रशाळेतल्या असंख्य मावशी नि काकांसोबत तुला आयुष्याच्या उत्तरार्धासाठी आशीर्वाद देत आहे. बाळ, माणूसपणाचा पोत जपत अशीच विजयपताका फडकवीत राहा.