
आशिया चषकामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात मिळवण्याचे टाळले होते. हीच परंपरा कायम ठेवत महिला वर्ल्डकपमध्येही महिला खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. परंतू आता मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान जोहर कपमध्ये टीम इंडियाच्या ज्युनिअर हॉकी संघाने सामना सुरू होण्याच्या आधीच पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं आहे.
मलेशियातील जोहोर बहरू येथील तमन दया हॉकी स्टेडियमवर हिंदुस्थानचा पुरुष ज्युनियर हॉकी संघ आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. हा सामना दोन्ही संघांनी हस्तांदोलन करून सुरू केला. त्यामुळे सोशल मीडियावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांनी 3-3 असे गोल केल्यामुळे सामना अनिर्णिती सुटला आहे. पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने ब्रिटनचा 3-2 अशा फरकाने पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 4-2 अशा फरकाने पराभव केला होता. त्यामुळे सध्या सात गुणांसह हिंदुस्थानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.