
सामना ऑनलाईन । मुंबई
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी गेली अनेक वर्षे आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या आयुष्यात सदैव सुमन सुगंध पसरवला. समकालीन गायकांची तगडी स्पर्धा असतानाही त्यांनी भावगीत आणि चित्रपट संगीत क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. सुमनताईंच्या गीतांचा हा प्रवास ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. येत्या रविवार, २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे ‘सुमन सुगंध’ हा कार्यक्रम होणार आहे. पराग प्रतिष्ठान आणि नाट्यपराग या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सुमनताईंच्या स्वरसाजातून बहरलेल्या गीतांसोबतच त्यांच्या आठवणींची मैफलही रंगणार आहे. सुमनताईंची विशेष मुलाखत सादर होईल. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव हे प्रमुख अतिथी आहेत. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते सुमनताई आणि यशवंत देव यांचा सन्मान करण्यात येईल. ‘सुमन सुगंध’ या कार्यक्रमाची संकल्पना मंगला खाडिलकर यांची आहे. माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करलगीकर हे गायक ही मैफल रंगवतील.























































