कुस्तीपटू सुमीत मलिकची झेप;  हिंदुस्थानसाठी मिळवला ऑलिम्पिक कोटा

हिंदुस्थानचा कुस्तीपटू सुमीत मलीक याने शुक्रवारी कुस्तीच्या मॅटवर उत्तुंग झेप घेतली. सोफिया येथे सुरू असलेल्या जागतिक पात्रता फेरीत 125 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारून सुमीत मलिकने टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानकडून कोटा मिळवला. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा सुमीत मलिक हिंदुस्थानचा चौथा पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा हिंदुस्थानचा हा सातवा कुस्तीपटू ठरलाय हे विशेष!

सुमीत मलिकने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तझिकिस्तानच्या रुस्तम इस्कानदरीला पराभूत केले. या लढतीत सुमीत मलिककडे 2-0 अशी आघाडी होती. त्यानंतर सुमील मलिक 2-4 अशा पिछाडीवर होता. पण अखेरच्या क्षणी 4 गुण संपादन करीत त्याने ही लढत जिंकली. यानंतर पार पडलेल्या सेमी फायनलमध्ये सुमीत मलिकने वेनेझुएलाच्या जोस डॅनियल रॉबर्टीचा 5-0 अशा फरकाने धुक्वा उडवला. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणाऱया सर्व कुस्तीपटूंना टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणार आहे.

तीन महिला कुस्तीपटूंचे पाऊल पडते पुढे

सुमीत मलिक हा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा हिंदुस्थानचा सातवा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी पुरुष गटामध्ये रवी दहीया (57 किलो वजनी गट), बजरंग पुनिया (65 किलो वजनी गट), दीपक पुनिया (86 किलो वजनी गट) यांनी तर महिला गटामध्ये विनेश पह्गाट (53 किलो वजनी गट), अंशु मलिक (57 किलो वजनी गट) व सोनम मलिक (62 किलो वजनी गट) यांनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले आहे.

अमित, कडियन पराभूत

सुमीत मलिकने या स्पर्धेत ठसा उमटवत टोकियो ऑलिम्पिकच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पण या स्पर्धेत हिंदुस्थानच्या दोन कुस्तीपटूंना निराशेचा सामना करावा लागला आहे. अमित धनकर याला 74 किलो वजनी गटात मोल्दोवाच्या मिहेल सावा याच्याकडून हार सहन करावी लागली. सत्यवर्त कडियन याला 97 किलो वजनी गटात बल्गेरीयाच्या अहमद सुल्तानोविचने पराभूत केले.

आपली प्रतिक्रिया द्या