
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांचा कार्यकाळ येत्या 1 डिसेंबरला संपत असून त्यांची जागा विद्यमान निवडणूक आयुक्त सुनील अरोरा घेणार आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी अरोरा यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदावरील नियुक्तीला पुष्टी दिली. येत्या 2 डिसेंबरला अरोरा हे नवा पदभार स्वीकारणार आहेत.
अरोरा हे हिंदुस्थानी प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) 1980 च्या तुकडीतील राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. 31 ऑगस्ट 2017 रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. कायदा मंत्रालयाने सोमवारी अरोरा यांच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तबासाठी त्यांच्या नियुक्तीचा आदेश राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. अरोरा यांच्या नियुक्तीच्या औपचारिक घोषणेची अधिसूचना लवकर काढण्यात येईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्राने दिली.
























































