
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 1992 च्या वर्ल्डकप संघाचे कर्णधार इम्रान खान यांच्या खालावलेल्या प्रकृतीवरून जागतिक क्रिकेट वर्तुळातून तीव्र पडसाद उमटत आहेत. हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावस्कर आणि 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्यासह जगातील 14 दिग्गज माजी कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र लिहून इम्रान खान यांना’तातडीने वैद्यकीय सुविधा आणि मानवीय वागणूक देण्याची मागणी केली आहे.
इम्रान खान (वय – 73) सध्या रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातम्या समोर येत आहेत. विशेषतः इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी 85 टक्क्यांनी कमी झाल्याचा अहवाल समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातील दिग्गजांनी एकत्र येत पाकिस्तान सरकारकडे धाव घेतली आहे.
सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यासह जगभरातील 14 माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र पाठवले आहे. मैदानावरचे आमचे वैर स्टंप काढले की संपते, पण आदर कायम राहतो. इम्रान खान यांनी खेळाडू म्हणून जगभरातील पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांना योग्य कायदेशीर आणि वैद्यकीय सन्मान मिळायला हवा, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधारांचा समावेश आहे. हिंदुस्थानच्या सुनील गावस्कर, कपिल देव, ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, ॲलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, किम ह्युजेस, बेलिंडा क्लार्क, इंग्लंडच्या मायकल आथर्टन, नासिर हुसेन, डेव्हिड गोवर, मायकल ब्रेअरली, तसेच वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉयड आणि न्यूझीलंडच्या जॉन राइट या दिग्गजांच्या या पत्रावर सह्या आहेत.
14 Former International Cricket Captains, including Padma Bhushan Sunil Gavaskar, Padma Bhushan Kapil Dev, Greg Chappell, Stephen Waugh, write to the Government of Pakistan regarding the reported condition of Imran Khan, former Prime Minister and former Captain of the Pakistan… pic.twitter.com/X0gmL2nE28
— ANI (@ANI) February 17, 2026
तीन प्रमुख मागण्या
तात्काळ वैद्यकीय उपचार – इम्रान खान यांना त्यांच्या पसंतीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेण्याची परवानगी मिळावी.
मानवीय वागणूक – इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तुरुंगात सुविधा द्याव्यात आणि कुटुंबाला भेटण्याची नियमित परवानगी मिळावी.
न्याय्य कायदेशीर प्रक्रिया – इम्रान खान यांच्यावरील खटल्यांमध्ये पारदर्शकता असावी आणि कायदेशीर प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये.
दरम्यान, या पत्रावर सध्या कोणत्याही माजी पाकिस्तानी कर्णधाराची स्वाक्षरी नसली तरी, वसीम अक्रम, वकार युनूस आणि शाहिद आफ्रिदी यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करत त्यांना योग्य उपचार देण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.


























































