मॅच फिक्सिंग रोखणे अशक्य; सुनील गावसकर यांचे मत

471

मॅच फिक्सिंगबाबत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. मॅच फिक्सिंग रोखणे अशक्य असल्याचे ते म्हणाले आहेत. क्रिकेट या खेळातही अनेक खेळाडू आणि अधिकारी असे असतात की त्यांच्यावरही स्वार्थ आणि लालसेमुळे परिणाम होतो. त्यामुळे यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे कठीण आहे. प्रत्येकाचा स्वभाव आणि विचार बदलणे शक्य नाही. त्यामुळे हे रोखण्यासाठी कोणताही उपाय नाही. तमीळनाडू प्रिमियर लीगशी संबंधित खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर गावसकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

लालसा आणि स्वार्थ या अशा गोष्टी आहेत, ज्यावर शिक्षण, मार्गदर्शन, भ्रष्टाचारविरोधी कायदे कशाचाही उपयोग होत नाही. हे रोखण्यासाठी कितीही सेमिनार घेतले, मार्गदर्शन केले, कायदे केले, तरी तो मानवी स्वभाव आहे, त्याला आपण आळा घालू शकत नाही. कधी कोणता खेळाडू कोणत्या लालसेला,मोहाला बळी पडले हे आपण सांगू शकत नाही, असे ते म्हणाले. बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

विकसीत, सभ्य आणि सुसंस्कृत समजातही विकृती असतात. क्रिकेट हा खेळही मानवी स्वभावावरच अवलंबून आहे. यातही अशा काही व्यक्ती आहेत, ज्या कोणत्या त्या कोणत्या कारणामुळे मोहाला बळी पडू शकतात. मात्र, आता परिस्थिती सुधारली आहे. चुकीच्या गोष्टी करून कोणीही वाचू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काही वेळा अनेकजण विचार करतात, अनेक बंधने असल्याने आपण एकदा ही गोष्ट करू आणि त्यातून बाहेर पडू, मात्र, यातून बाहेर पडणे शक्य होत नाही. आता चुकीच्या गोष्टी करून कोणीही वाचू शकत नाही, असे ते म्हणाले. आता प्रसारमाध्यमे सशक्त झाली आहेत, त्यामुळे कोणतीही गोष्ट लपून राहणे शक्य नाही. तसेच याबाबतचे कायदेही कठोर आहेत. त्यामुळे आता कोणतीही चूक लपून राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या