मालिका थरारक, पण जिंकणार हिंदुस्थानच; सुनील गावसकरांचे भाकीत

आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे वातावरण हळूहळू तापू लागलेय आणि दोन्ही संघांमध्ये ‘वर्डवॉर’ही रंगू लागलेय. खुद्द महान फलंदाज सुनील गावसकर यांनी ही मालिका थरारक होणार असल्याचे सांगितले, पण ही मालिका 3-1 ने जिंकणार हिंदुस्थानी संघच असे भाकीत वर्तवत ऑस्ट्रेलियन संघाला चांगलेच तापवलेय.

या बहुप्रतीक्षित मालिकेतील ऑस्ट्रेलियात झालेल्या दोन्ही मालिका हिंदुस्थानने जिंकलेत. मग ती मालिका 2018-19 ची असो किंवा 2020-21 ची. दोन्ही मालिका थरारक झाल्या, पण चार सामन्यांच्या दोन्ही मालिका हिंदुस्थानने 2-1 जिंकल्या. आता मालिका पाच कसोटींची होणार असून यात हिंदुस्थान 3-1 असे दणदणीत यश मिळवेल आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात लोळविण्याच्या पराक्रमाची हॅटट्रिक साधेल, असा दृढ विश्वास गावसकर यांनी आपल्या लेखात व्यक्त केलाय.

उभय संघांमध्ये तीन दशकानंतर पाच कसोटी सामन्यांची मालिका रंगतेय. सध्या दोन्ही संघ प्रतिभावान आणि तुल्यबळ आहेत. एवढेच नव्हे तर कसोटी क्रिकेटच आमच्यासाठी सर्वोत्तम आणि आवडते क्रिकेट असल्याचे दाखवून देतील. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे ही मालिकाही रोमहर्षक होईल आणि ही मालिका हिंदुस्थान 3-1 जिंकेल, अशी माझी भविष्यवाणी असल्याचेही गावसकर यांनी आवर्जून लिहिलेय. ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा फटका डेव्हिड वॉर्नरचा बसणार आहे. या वर्षाच्या प्रारंभीच वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलीय, त्याची उणीव ऑस्ट्रेलियाला नक्कीच जाणवेल. आता स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा हे सध्या डावाची सुरुवात करत असले तरी त्यांना सात डावांत 21.3 च्या सरासरीने धावा केल्यात. वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाची सलामी कमपुवत ठरतेय आणि त्यांची मधली फळीसुद्धा दुबळी पडलीय. हे हिंदुस्थानच्या पथ्यावर पडेल.

गावसकर पुढे म्हणालेत, काही लोकांनी ऑस्ट्रेलियाला आधीच मालिकेत प्रबळ दावेदार मानलेय. 1991-92 नंतर प्रथमच दोन्ही संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळताहेत. 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी हिंदुस्थानला तयारीसाठी चांगला वेळ मिळणार आहे, जे अशा प्रकारच्या मालिकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपला नेहमीप्रमाणे माइंड गेम सुरू केलाय, जे आपले विचार व्यक्त करताहेत, मात्र ते ग्लेन मॅकग्रासारखे ऑस्ट्रेलिया 5-0 ने जिंकणार अशा प्रतिक्रिया देत नाही आहेत. तरी ते ऑस्ट्रेलिया जिंकणार, ही भविष्यवाणी करताहेत. दुःखाची गोष्ट ही आहे की, ऑस्ट्रेलियाच्या या माइंड गेमला रवी शास्त्राr यांचा अपवाद वगळता कोणीही आव्हान देऊ शकलेला नाही.  या गेममध्ये आता रविचंद्रन अश्विननेही उडी घ्यायला हवी. तोसुद्धा स्टीव्ह स्मिथसाठी एक नवा चेंडू विकसित करतोय. तसेच जर स्मिथ सलामीला उतरण्याची तयारी करत असेल तर त्याने जसप्रीत बुमरापासून सावध रहावे, असाही सल्ला द्यावा.