प्रत्येक चेंडू ठोकायचा हा खेळ नाही! गावसकर यांनी हिंदुस्थानी संघाला दाखवला आरसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांचा दणका बसल्यानंतर दिग्गज सुनील गावसकर यांनी हिंदुस्थानच्या फलंदाजांना थेट आरसा दाखवला आहे. टी-20 म्हणजे प्रत्येक चेंडू ठोकायचाच आणि सीमारेषेबाहेर पाठवायचा खेळ नाही. परिस्थिती ओळखा, अहंकार सोडा, असा सल्ला त्यांनी दिला.

दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 20 अशी बिकट होती; पण डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी 97 धावांची भागीदारी रचत डाव सावरला. संयम, परिस्थितीचं भान आणि योग्य फटके ही त्यांची गुरुकिल्ली होती. अखेरीस 7 बाद 187 ही लढाऊ धावसंख्या उभी राहिली.

हिंदुस्थानने मात्र त्यातून काहीच शिकले नाही. 18.5 षटकांत 111 धावांत खेळ खल्लास. हा पराभव नव्हे, तर बेफिकिरीचा परिणाम होता, असेही गावसकरांनी ठणकावून सांगितले.

अति आत्मविश्वास नडला

हिंदुस्थानी फलंदाज अतिआत्मविश्वासाने उतरले. प्रत्येक चेंडूवर फटका मारायचा हट्ट केला आणि विकेट्स गमावल्या. टी-20 क्रिकेट असा खेळत नाहीत, असेही त्यांनी सुनावले. पॉवरप्लेमध्येच ईशान किशन (0), अभिषेक शर्मा (15) आणि तिलक वर्मा (1) परतले. तिलक हुशार फलंदाज आहे; पण या सामन्यात संयम दिसला नाही. क्रीजवर वेळ घालवणं आणि भागीदारी करणं आवश्यक होतं.

झिम्बाब्वेविरुद्ध बदल हवा!

झिम्बाब्वेविरुद्ध अंतिम अकरात अक्षर पटेल हवा. झिम्बाब्वेमध्ये डावखुरे कमी आहेत. अक्षरचा उपयोग होईल, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती. अर्शदीप सिंहने चांगली गोलंदाजी केली असल्याने आता कोणाला बाहेर बसवायचं, हा खरा पेच आहे. झिम्बाब्वेविरुद्ध एक-दोन बदल हवेच.