
सामना ऑनलाईन । पुणे
मराठमोळ्या मुंबईकर सुनीत जाधवने आपल्या पिळदार स्नायूचे आणि आखीव, रेखीव शरीराचे दमदार प्रदर्शन करत 52व्या एशियन बॉडीबिल्डिंग ऍण्ड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रतिष्ठेच्या मिस्टर आशिया किताबावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत यजमान हिंदुस्थानने पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण पंधरा पदके जिंकून पुरुषांच्या श्रेणीतील विजेतेपदाचा बहुमानही मिळवला.
बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. ‘हिंदुस्थानला सतत हुलकावणी देत असलेला हा किताब जिंकता आला, याचा मला नक्कीच आनंद आहे. आता माझा प्रयत्न देशासाठी ‘मि. इंडिया’ हा किताब जिंकण्याचा असेल,’ असा निर्धार तीन वेळा ‘मि. इंडिया’ किताब जिंकण्यार्या सुनीत जाधवने व्यक्त केला.


























































