अर्जित रजेवर गेलेले पोलीस अधीक्षक दोशी कामावर रुजू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्जित रजेवर गेलेले जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे सक्तीच्या रजेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सातारा जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत पोलिसांनी राष्ट्रवादी सदस्याच्या अपहरणप्रकरणी दोन सदस्यांना अटक केली. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे तसेच मंत्र्यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप झाला. त्यावरून विधान परिषद व विधानसभेतही विरोधकांनी आवाज उठवला. त्यामध्ये जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशींसह अन्य अधिकाऱ्यांकर कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. हा वाद सुरू असतानाच, जिल्हा पोलीसप्रमुख दोशी रजेवर गेले. त्यावर ‘ही सक्तीची रजा आहे की अर्जित रजा,’ यावर चर्चा रंगली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यात यावरून कलगीतुराही रंगला होता. दरम्यान, अर्जित रजेवर गेलेले पोलीस प्रमुख दोशी यांनी कार्यालयात हजर होऊन पदभार स्वीकारला. त्यामुळे सक्तीच्या रजेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.