महिला वाहतूक पोलिसाकडे वरिष्ठांनीच मागितली महिना १५ हजारांची लाच; पोलीस निरीक्षक, अंमलदार, सहाय्यक उपनिरीक्षकावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला पोलीस कर्मचाऱ्याकडेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दरमहिना १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरच्या काशिमीरा वाहतूक पोलीस विभागात समोर आला आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज गोलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून कुंपणच शेत खात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काशिमीरा वाहतूक विभागात आपले कर्तव्य बजावणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे तिच्याच विभागातील वरिष्ठांकडून दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली जात होती. वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वसुली करून ठरावीक रक्कम कार्यालयात जमा करावी, असा दबाव त्यांच्यावर होता. मात्र या जाचाला कंटाळून संबंधित महिला कर्मचाऱ्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुराव्यासह तक्रार केली. या तक्रारीचे गांभीर्य ओळखून मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात एंट्री मारली. सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद सावंत यांनी चौकशी केली असता वाहतूक पोलीस निरीक्षक सागर इंगोले व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज गोलार यांनी पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात दोन भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशी अहवालात सिद्ध
शहरातील ‘वसुली नाका’ देण्यासाठी प्रति महिना १५ हजार पोलीस निरीक्षक व २ हजार ५०० ड्युटी अंमलदार असे एकूण २० हजार महिना मागितले असल्याची तक्रार महिला पोलीस हवालदार यांनी केली होती. चौकशी अहवालात लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर पंचनामा तयार करून दोन अधिकाऱ्यांवर ३० मार्चला काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हप्त्यास नकार दिल्यास कर्मचाऱ्यावर दबाव
हप्ता देण्यास नकार दिल्याने संबंधित महिलेवर कामाचा दबाव टाकून तिला त्रास दिला जात होता, असा दावा तक्रारदार महिला कर्मचाऱ्याने केला आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांकडून होणारी दंड वसुली नेमकी कुणाच्या खिशात जाते, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. पोलीस प्रशासन आता या हप्तेखोर भ्रष्ट साखळीवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.