
इंडिगो एअरलाईन्सची हजारो उड्डाणे रद्द झाल्यामुळे लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर नरेंद्र मिश्रा यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांचे सर्व मुद्दे दिल्ली उच्च न्यायालयात विचाराधीन आहेत. तेथे या प्रकरणाशी संबंधित याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. तुमच्या तक्रारींचे तेथे निवारण झाले नाही तर तुमचे इथे स्वागत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. इंडिगो प्रकरणी डीजीसीएने एक तज्ञांची समिती स्थापन केली आहे, याकडे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते.



























































