
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेली कोल्हापूरची महादेवी अर्थात माधुरी हत्तीण नांदणी मठात परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. माधुरीला गुजरातच्या वनतारा संस्थेकडून पुन्हा कोल्हापूरला पाठवण्यासंबंधी उच्चस्तरीय समितीने निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. हा निर्णय कोल्हापूरकरांच्या लढय़ाला मोठे यश मानले जात आहे. नांदणी मठ सोमवारी उच्चस्तरीय समितीकडे अर्ज करणार आहे. त्यावर निर्णय होऊन माधुरी कोल्हापुरात परतण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरकरांनी तीव्र विरोध केल्यानंतरही माधुरी हत्तिणीला नांदणी मठातून गुजरातमध्ये जामनगर येथील ‘वनतारा’ संस्थेकडे हलवण्यात आले. ‘पेटा’ संस्थेच्या तक्रारीनंतर माधुरीचे स्थलांतरण करण्यात आले. त्या निर्णयाविरोधात कोल्हापूरकरांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
समितीच्या निर्णयाकडे लक्ष
राज्य सरकार, वनतारा व नांदणी मठातर्फे न्यायालयात मांडलेल्या भूमिकेनुसार नांदणी मठाकडून उच्चस्तरीय समितीकडे सोमवारी अर्ज केला जाईल, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘पेटा’च्या वकिलांनी घेतला आक्षेप
महाराष्ट्र सरकारने माधुरी हत्तिणीला पुन्हा कोल्हापूरला आणण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यावर पेटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. माधुरीची प्रकृती चिंताजनक असून नांदणी मठात कोणत्याही वैद्यकीय सुविधा नाहीत, असा मुद्दा पेटाच्या वकिलांनी उपस्थित केला. त्यावर न्यायालयानेही माधुरीच्या उपचाराबाबत काय करणार आहात, असा प्रश्न उपस्थित केला.