तेलंगणातील आमदार अपात्रतेचा फैसला आठवडय़ात करा, न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश

तेलंगणामध्ये पक्षांतर करून काँग्रेसमध्ये जाणाऱ्या भारत राष्ट्र समितीच्या 10 आमदारांच्या आपत्रतेबाबत 2 आठवडय़ांमध्ये निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. हे प्रकरण निकाली काढून नवे वर्ष साजरे करायचे की न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणाला सामोरे जायचे, हे विधानसभा अध्यक्षांनी ठरवावे, असे खडे बोल कोर्टाने सुनावले.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना धारेवर धरले. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना कोणतेही घटनात्मक संरक्षण नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. दोन आठवडय़ांत या प्रकरणाचा निकाल लावा, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणाचा सामना करा.