कोरोना काळात मृत्यू झालेल्या खासगी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षणाचा हक्क; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केलेल्या आणि कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या खासगी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोरोना महामारीदरम्यान कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आरोग्य विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणाचा लाभ मिळवण्याचा हक्क आहे, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. त्यामुळे संपूर्ण देशातील खासगी डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई परिसरात कोरोना महामारीच्या काळात रुग्णसेवा बजावताना डॉक्टरचा मृत्यू झाला होता. डॉक्टरच्या कुटुंबीयांनी विमा संरक्षणासाठी दावा केला होता. तथापि, त्यांचा दावा विमा कंपनीने फेटाळला होता. त्याविरोधात कुटुंबीयांनी कायदेशीर लढाई सुरू केली होती. यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने खासगी डॉक्टर केंद्र सरकारच्या विमा योजनेचा हक्कदार नसल्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला मृत डॉक्टर डॉ. बी.एस. सुरगडे यांच्या विधवा पत्नीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने गुरुवारी निर्णय दिला.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला आणि कोरोना काळात रुग्ण सेवा करताना मृत्युमुखी पडलेल्या खासगी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळवण्याचा हक्क असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला. कोरोना महामारीच्या काळात बलिदान दिलेल्या डॉक्टरांना, त्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळणार नाही असे म्हणता येणार नाही, असे न्यायमूर्ती नरसिंह यांनी निकाल देताना नमूद केले.