
देश-विदेशातील कृष्ण भक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या बंगळुरू येथील इस्कॉन मंदिराच्या मालकी हक्काबाबत वादावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय सुनावला. या निर्णयानंतर बंगळुरू येथील हरे कृष्ण मंदिराच्या मालकी हक्काच्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला. बंगळुरूमधील हरे कृष्ण मंदिरावरील इस्कॉन सोसायटी, बंगळुरूचा दावा न्यायालयाने कायम ठेवला आहे.
आध्यात्मिक आणि वैचारिक मुद्द्यांवर मतभेदांमुळे सुमारे 25 वर्षांपूर्वी इस्कॉन बंगळुरूने इस्कॉन जनरल बॉडीपासून वेगळे झाले. यानंतर 2001 मध्ये इस्कॉन बंगळुरूने मंदिर आणि इतर मालमत्तांवर दावा केला. हा दावा दिवाणी न्यायालयाने 2009 मध्ये मान्य केला. परंतु 2011 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निर्णय रद्द करत मंदिर आणि इतर मालमत्ता इस्कॉन मुंबईकडे सोपवल्या.
इस्कॉन बंगळुरूने 23 मे 2011 च्या उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत 2 जून 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत हरे कृष्ण मंदिर इस्कॉन, बंगळुरूचे असल्याचे निकालात म्हटले. न्यायमूर्ती ए. एस. ओका आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.