सोनम वांगचुक अटक प्रकरण, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

लडाख आंदोलनाचे नेते व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करताना त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो यांना पूर्वकल्पना का दिली गेली नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

गीतांजली अँगमो यांनी वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. वांगचुक यांची अटक बेकायदा असून त्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कुटुंबीयांना त्यांची भेटही घेऊ दिली जात नाही, असा दावाही त्यांनी याचिकेत केला आहे. न्या. अरविंद कुमार आणि एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठापुढे त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने केंद्र सरकार, जम्मू-कश्मीर सरकार आणि राजस्थान सरकारला नोटीस बजावली.

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या परिशिष्टात समावेशाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान 24 सप्टेंबर रोजी लेहमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यानंतर दोनच दिवसांत वांगचुक यांना अटक करण्यात आली. ते सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत.