इस्कॉनच्या वादावर सुप्रीम कोर्ट म्हणाले, भगवान कृष्ण काय विचार करत असतील…

इस्कॉन मुंबई व बंगळुरू यांच्यात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भगवान श्रीकृष्ण या सगळय़ाबद्दल काय विचार करत असतील, असे परखड मत न्यायालयाने व्यक्त केले.

बंगळुरू येथे हरे कृष्ण मंदिर आहे. या मंदिराची मालकी तेथील इस्कॉन संस्थेची असल्याचा निकाल मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाचा पुनर्विचार व्हावा यासाठी मुंबई इस्कॉनने याचिका केली आहे. न्या. एम. एम. सुंदरेश, न्या. सतीश चंद्र शर्मा व न्या. पी. के. मिश्रा यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने हे परखड मत व्यक्त केले व इस्कॉन बंगळुरूसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली.

काय आहे प्रकरण

बंगळुरू दिवाणी न्यायालयाने इस्कॉन बंगळुरूचा मंदिरावरील अधिकार वैध ठरवला, मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने मुंबई इस्कॉनची मालकी मान्य केली. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी झाली. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने इस्कॉन बंगळुरू संस्थेचे स्वतंत्र अस्तित्व असल्याचा निर्वाळा दिला व मंदिराचा हक्कही मंजूर केला. या निकालाचा पुनर्विचार विचार व्हावा यासाठी इस्कॉन मुंबईने याचिका केली. यावर निकाल देताना दोन न्यायमूर्तींनी भिन्न मते व्यक्त केली. त्यामुळे हे प्रकरण पूर्णपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.

इस्कॉन मुंबईचा दावा

इस्कॉन मुंबई ही मूळ संस्था आहे. इस्कॉन बंगळुरू ही सहाय्यक संस्था आहे. सहाय्यक संस्था मंदिरावर दावा करू शकत नाही. मे महिन्यात दिल्या गेलेल्या निकालात अनेक कायदेशीर बाबींचा विचार केला गेला नाही, असा दावा इस्कॉन मुंबईने केला आहे.

न्यायालयाचे निरीक्षण

बंगळुरू इस्कॉन ही संस्था कायदेशिररित्या स्वतंत्र आहे. तिची नोंदणी कोणत्याही सहायकाच्या अंतर्गत करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे या संस्थेचा हरेकृष्ण मंदिरावरील दावा योग्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिलेल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले आहे. यावर मुंबई इस्कॉनने तिक्र आक्षेप घेतला आहे.