
एखाद्या रुग्णाने उपचारांना अनुकूल प्रतिसाद दिला नाही किंवा उपचारानंतर तो बरा झाला नाही म्हणून डॉक्टरवर सरसकट निष्काळजीपणाचा आरोप करता येणार नाही. त्यांना थेट जबाबदार धरता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
बाळंतपणानंतर झालेल्या एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय तक्रार निवारण आयोगाने डॉक्टर व रुग्णालयाला दोषी ठरवले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले होते. न्यायमूर्ती संजय कुमार आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने तो निकाल रद्द करत डॉक्टरांना दिलासा दिला. कोणताही समंजस डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीचे नुकसान होईल किंवा त्याला दुखापत होईल असे कृत्य जाणीवपूर्वक करणार नाही. त्याने तसे केल्यास त्याची प्रतिष्ठा आणि व्यवसाय धोक्यात येईल. ते त्याला महागात पडू शकते, असे न्यायालयाने यापूर्वीच्या एका निकालाचा हवाला देत निदर्शनास आणून दिले.
‘कधी कधी सर्व प्रयत्न करूनही रुग्ण बरा होत नाही किंवा शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही. याचा अर्थ डॉक्टर किंवा सर्जनचा निष्काळजीपणा त्यास जबाबदार आहे, असे म्हणता येत नाही. तसे सिद्ध करणारे मजबूत पुरावे असणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण झाले आहे, पण…
वैद्यकीय व्यवसायाचे काही प्रमाणात व्यापारीकरण झाले आहे हे खरे आहे. काही डॉक्टर पैशाच्या मोहापायी डॉक्टर म्हणून घेतलेली शपथ विसरले आहेत. मात्र काही मूठभर लोकांच्या चुकीसाठी संपूर्ण वैद्यकीय समुदायावर अप्रामाणिकपणाचा ठपका ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.