
भटक्या कुत्र्यांसंदर्भातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना खडे बोल सुनावले. अजमल कसाबने न्यायालयाचा अवमान केला नाही, परंतु मनेका गांधी यांनी केला आहे, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने संताप व्यक्त केला. आम्ही सुनावणीदरम्यान केलेल्या टिप्पण्या म्हणजे गंमत नाही. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला किंवा जखमी झाल्यास नगरपालिकेसोबतच डॉग फिडर्सवरही जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते, असे न्यायालयाने संतप्त होत म्हटले आहे.
न्या. विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर भटक्या कुत्र्यांशी संबंधित याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने अतिशय संतप्त होत म्हटले की, यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान आम्ही केलेल्या टिप्पण्यांना गंमत समजणे चुकीचे ठरेल. आम्ही गंभीर आहोत. कोणाची जबाबदारी निश्चित करण्यावरून न्यायालय मागे हटणार नाही. सध्याच्या व्यवस्थेत स्थानिक प्रशासनाचे अपयश समोर आले आहे. भटक्या कुत्र्यांशी संबंधित नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. याची किंमत सर्वसामान्य जनतेला मोजावी लागत आहे, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
– मनेका गांधी यांचे वकील राजू रामचंद्रन यांना सर्वोच्च न्यायालयाने संतप्त होत म्हटले की, तुम्ही न्यायालयाला संयम ठेवायला सांगत आहात, मात्र तुमच्या पक्षकार कशा पद्धतीने वक्तव्ये करीत आहेत हे तुम्ही पाहिले का? त्यातून न्यायालयाचा अवमान होतो. आम्ही उदारता दाखवत तशी कोणतीही कार्यवाही सुरू करत नाही, असे म्हणत मनेका गांधी केंद्रात मंत्री असताना भटक्या कुत्र्यांसाठी कशा प्रकारची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती, असा प्रश्न केला. त्यावर रामचंद्रन म्हणाले की, हा धोरणात्मक मुद्दा आहे. मी अजमल कसाबसारख्या प्रकरणातही बाजू मांडलेली आहे. त्यावर न्या. विक्रम नाथ अतिशय कठोर शब्दांत म्हणाले की, अजमल कसाबने न्यायालयाचा अवमान केला नव्हता, मात्र तुमच्या पक्षकाराने केला आहे.



























































