भाजपच्या 106 आमदारांबाबत दुःख वाटते, निष्ठावंतांकडे दुर्लक्ष; सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक बदल होत आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह थेट सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राज्याचे राजकीय समीकरण बदलले आहे. या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली. अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचे कारण, पक्षाचे भवितव्य, कायदेशीर लढाई आणि कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची जबाबदारी, याबद्दल त्यांनी मते व्यक्त केली. तसेच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर हल्लाबोल करत भाजपच्या 106 आमदारांबाबत आपल्याला दुःख होते. भाजपमध्ये निष्ठावंतांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्या म्हणाल्या.

आज आम्ही शून्यावर आलो असलो तरी यापुढे आता वरच जाऊ, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीला भाजपला जबाबदार धरले आहे. अजित पवार यांच्या गटाशी त्यांचा वैचारिक विरोध असून कुटुंब म्हणून अजूनही आम्ही एक आहोत आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करणे, हेच त्यांचे एकमेव ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातील फूट माझ्यासाठी खूपच दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. कारण- हा विचारधारा आणि तत्त्वांचा लढा आहे. आम्ही भाजपविरोधात निवडणूक लढलो आणि जेव्हा आमचाच एक गट त्यांनाच जाऊन मिळतो, तेव्हा पक्ष नक्कीच विस्कळित होतो, हे निश्चितच दुर्दैवी आहे. हे एक भावनिक विभाजन आहे. राजकारण हे विचारसरणी आणि तत्त्वांशी संबंधित आहे. हा काही व्यवसाय किंवा नोकरी नाही की, मला एके ठिकाणी काम करणे आवडत नाही म्हणून मी दुसरीकडे जातो. राजकारण आणि व्यवसाय यांच्यामध्ये विचारसरणी हाच महत्त्वाचा धागा आहे; जो त्यांना वेगळा ठरवतो.

अजित पवार बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट कारण होते, असे आपल्याला वाटत नाही. तसेच त्यांनी काहीही आरोप केलेले नाहीत. भाजपबरोबर हातमिळवणी करायची की नाही, एवढाच प्रश्न होता. पक्षातील काही सदस्यांना याबाबत कोणतीही अडचण नव्हती, परंतु आम्ही याला हरकत घेतली होती. मला वाटते, हेच एकमेव कारण असावे. हे (पक्षातील फूट) काही पहिल्यांदा होत नाही; भूतकाळातही असे प्रयत्न अनेकदा झालेले आहेत. भाजप त्यांच्या रणनीतीमध्ये अनेकदा बदल करीत असतो. सुरुवातीला अपयश आल्यानंतर त्यांनी तिसऱ्या वेळेस आणखी मोठे नियोजन केले. आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये विचारधारेची मोडतोड होतेय, हे फारच दुर्दैवी आहे. माध्यमे म्हणत आहेत की, हे सत्तेसाठी आहे, काही म्हणतात विकासासाठी, तर काही म्हणतात यामागे केंद्रीय यंत्रणा आहेत. कारण काहीही असू शकते; जे लोक भाजपमध्ये गेले आहेत, तेच याचे योग्य कारण देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

भूतकाळात झालेल्या गोष्टींमध्ये अडकून राहण्याची आवश्यकता मला वाटत नाही. कारण- देशासमोर यापेक्षाही मोठमोठ्या अडचणी आहेत. महागाई वाढली आहे, बेरोजगारी, डेटा प्रोटेक्शन ॲक्ट यांसारखे महत्त्वाचे प्रश्न देशासमोर असताना, कोण काय बोलले याची चर्चा का करावी? त्यांनी बाहेर पडल्यावर काही आरोप केले ते दुःखद आणि भावनिकदृष्ट्या वेदनादायी आहे. पण मी लोकशाहीमधील संवादाला अधिक महत्त्व देते. आम्ही शत्रू नाही; तर आमच्यात वैचारिक फरक आहे, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी फुटीनंतर जाहीर सभांमधून ज्या प्रकारे भूमिका मांडल्या आहेत, त्यावरून शरद पवारांचा त्यांना पाठिंबा आहे, असे कुणालाही वाटणार नाही. शेवटी आरोप त्यांनीच केलेले आहेत; आम्ही आरोपही केलेले नाहीत आणि असंसदीय भाषाही वापरलेली नाही.

मला भाजपच्या 106 आमदारांसाठी दुःख वाटते. इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल. मी जर त्यांच्या जागी असते, तर मला खूप दुःख झाले असते. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण दुर्दैवी आहे. सध्या भाजपमध्ये निष्ठावंतांकडे दुर्लक्ष होत आहे. या घटनांवरून भाजप महाराष्ट्रविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी कुटुंबाची मोडतोड केली, त्यांनी पक्षांमध्ये फाटाफूट केली. माझा संताप फक्त भाजपवर आहे. मी भाजपाव्यतिरिक्त इतर कुणावरही आरोप करणार नाही. त्यांचा प्रामाणिक लोकशाहीवर विश्वास नाही. नवा भाजप आमच्याकडे शत्रू म्हणून पाहतो. हा एक उथळ आणि संकुचित दृष्टिकोन आहे.आमचे सर्वांशीच वैयक्तिक संबंध चांगले आहेत आणि आम्हाला अनेकदा प्रस्तावही देण्यात आले. आम्ही हे कधीही वैयक्तिकरीत्या घेत नाही; पण कुटुंबावर हल्ले करणे योग्य नाही. या सर्व अटकळी असूनही शरद पवारांनी कधीही भाजपशी हातमिळवणी केली नाही, हेही तितकेच खरे आहे. कोणाशीही माझे वैयक्तिक वैर नाही. पण, वैचारिक स्तरावर भाजपबाबाबत आपला आक्षेप आहे. ज्या देशात एकमेकांच्या विरोधात द्वेष प्रकट करणे इतके सामान्य असेल आणि काही विषयांवर बोलताना भीती निर्माण होत असेल, तर मला हे अजिबात आवडणार नाही. सहकार संघराज्यवादाचा काळ आता संपला असून सर्व सत्ता केंद्रित झाली आहे, अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.