काँग्रेसने उमेदवार देणे गैर नाही; सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार; सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांचे कान टोचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार देणे गैर नाही. सशक्त लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या चौकटीत काम करायचे झाले तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याच अधिकार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. तसेच अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार आणि भाचा पार्थ पवार यांचेही काँग्रेस पक्षावर केलेल्या विधानावरून कान टोचले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा मोठा भाऊ अजितदादा गेल्यानंतरही ही निवडणूक आहे. आम्ही कर्ता पुरूष गमावला. अजूनही आम्ही त्या दु:खातून बाहेर पडलेलो नाही. सगळे कामाला लागले आहेत, पण दादा नाही याचे दु:ख आयुष्यभर राहील. आम्ही बारामतीला उमेदवार देणार नाही हे आधीच स्पष्ट केले होते. बाकीच्यांनी काय करायचे हे सशक्त लोकशाहीत वैयक्तिक आणि त्यांच्या पक्षाचा विषय असतो.

राज्यसभा निवडणुकीवेळी आम्ही सर्वच पक्षांनी चर्चा केली होती. एकमेकांवर विश्वास ठाखवला, उत्तम संवाद ठेवला, त्यामुळे शरद पवार बिनविरोध निवडून गेले. ही महाराष्ट्राची संस्कृती असून मतभेद असले पाहिजे, पण मनभेद असू नये. राज्यसभेवेळी सगळ्या पक्षांनी समंजसपणा दाखवला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्यात अनेक निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. काही ठिकाणी झालेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसची भूमिका सोकशाही पद्धतीची असून त्यात मला काही गैर वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचे ते म्हणाले होते. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष फार जवळून पाहिलेला आहे. अनेकदा काँग्रेससोबत लढलो आणि निवडून आलो. अजितदादा, आम्ही सगळे काँग्रेस विचारांच्या तालमीत लहानाचे मोठे झालेलो आहोत. देशावर इंग्रजांचे राज्य होते, तेव्हा याच काँग्रेसमुळे देशाला मोकळा श्वास घेता आला. स्वातंत्र्य हे काँग्रेसचे देणे आहे हे कुणी नाकारू शकत नाही.

बारामतीचा मतदार शांतपणे आपली भूमिका मतपेटीतून व्यक्त करेल; लोकशाहीत निवडणूक लढण्यास विरोध कशाला? – संजय राऊत

काँग्रेसचे योगदान फार मोठे राहिले आहेत. पंतप्रधान ते सरपंच… महिला आरक्षण, नरसिंह राव ते मनमोहन सिंग यांनी आणलेले आर्थिक धोरण या सगळ्याबाबत काँग्रेसचे योगदान नाकारून चालणार नाही. पण लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. त्यामुळे ते बोलत असतील, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच पार्थ पवारांच्या विधानाबाबत अजित पवार गटाला विचारले पाहिजे. ते अजित पवार गटाचे खासदार असून त्यांचे ते विधान आहे. त्यांच्याकडूनच संयुक्तिक उत्तर मिळू शकेल, असेही त्या म्हणाल्या.