ब्लॅक बॉक्सचं काय झालं? अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी सुप्रिया सुळे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात योग्य वेळी एफआयआर नोंदवला गेला नाही, तसेच चौकशी प्रक्रियेत विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पुण्यात सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकारमध्ये अजित पवार हे महत्त्वाचा घटक होते. मात्र, त्यांच्या अपघातानंतर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यांनी रोहित पवार यांनी या प्रकरणात सातत्याने मुद्दे मांडल्याचे नमूद करत, त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले.

काँग्रेस पक्ष आणि कर्नाटक सरकारने या प्रकरणात पुढाकार घेत एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. “ज्या महाराष्ट्र सरकारने न्याय द्यायला हवा होता, त्या ठिकाणी उशीर होत असताना काँग्रेसने पुढाकार घेतला,” असे त्या म्हणाल्या.

तसेच, या अपघाताच्या चौकशीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. चौकशी समिती स्थापन झाली का, तिचे अध्यक्ष कोण आहेत, आणि आतापर्यंत काय निष्कर्ष निघाले, याबाबत सरकारने माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सुळे यांनी ब्लॅक बॉक्स संदर्भातही शंका व्यक्त केली. “ब्लॅक बॉक्सबाबत वारंवार माहिती मिळेल असे सांगितले गेले, मात्र अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. फोन सापडू शकतात, तर ब्लॅक बॉक्स का सापडत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या घटनेत केवळ अजित पवार यांच्याच कुटुंबाचा नव्हे, तर इतर प्रवासी, वैमानिक आणि एअर होस्टेस यांच्या कुटुंबीयांचाही प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “सर्व संबंधितांना न्याय मिळणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, त्यांनी सरकारला आवाहन केले की, या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून तातडीने उच्च प्राधान्याने चौकशी पूर्ण करावी आणि सत्य जनतेसमोर मांडावे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठीही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.