
‘सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. निवडून आल्यापासून आमच्या बाबतीतही ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न झाला; पण आमच्यावर ईडी-बिडी चालत नाही. त्यामुळे आमच्यामागे इडा-पीडा नाही. आम्ही स्वाभिमानी मराठी माणसे आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फटकारले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष-खासदार शरद पवार यांच्यासमवेत आज सुप्रिया सुळे सातारा दौऱ्यावर आल्या होत्या. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ‘पद्मभूषण’ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७व्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या समाधीला शरद पवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या, ‘२०२९च्या निवडणुकीत सुनेत्रा पवार मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील,’ या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, सुप्रिया सुळे यांनी, ‘सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन,’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया दिली.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याच्या संदर्भात त्यांनी यावेळी भाष्य केले. ‘निवड प्रक्रियेवेळी मंत्र्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. संसदेत त्याविषयी चर्चा झाली. बाहेरच्या राज्यातील खासदारांनी, ‘तुमच्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे,’ असे मला विचारले. हे ऐकून मला अतिशय वेदना झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांना मानणाऱ्या पुरोगामी विचाराच्या सातारा जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतील तर त्याची अत्यंत वाईट चर्चा बाहेर होते, याचा विचार केला गेला पाहिजे,’ असे सांगत त्यांनी राडा करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ‘गुन्हेगारीत आता पुणे देशात पाचव्या, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सरकारने प्राथमिकता दिली पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी आज त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नसरापूरच्या आरोपीला भरचौकात फाशी द्या ! ‘नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या घटनेतील आरोपीला भरचौकात फाशी द्या,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
२०२९मध्ये कोण कुठे असेल, सांगता येत नाही !
‘सरकारमधीलच नेते सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. त्यामुळे २०२९च्या निवडणुकीवेळी कोण कुठे असेल, हे सांगता येत नाही,’ असे विधान करून सुप्रिया सुळे यांनी खळबळ उडवून दिली.

























































