
भाजपने दिलेल्या काँग्रेसमुक्त हिंदुस्थान या घोषणेचा परिणाम उलटा झाला आहे. देश काँग्रेसमुक्त होण्याऐवजी भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे. फक्त ठेके मिळविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची मुले भाजपमध्ये जात आहेत. उतारवयात या मुलांनी आपल्या वडिलांना जो त्रास दिला आहे, तो फार क्लेशदायक असल्यामुळे राजकारणाचा अर्थ हरवल्यासारखा झाला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी नवी मुंबई येथे करून स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना अप्रत्यक्ष जोरदार चपराक दिली.
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मी गेल्या 50 वर्षांत एवढे संतापलेले कधीच पाहिले नाही. मुलाने जर एकच प्रश्न पाच-पाच वेळा विचारला तर वडीलही रागवतात, तसाच तो प्रकार घडला. तोच तोच प्रश्न इतक्या वेळा विचारायला नको होता.
स्वार्थासाठी नीतिमूल्ये पायदळी
सध्या जे सुरू आहे, ते सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण नाही. राजकारणामध्येही काही नीतिमूल्ये असतात, ते पाळणे आवश्यक असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्वार्थासाठी ती पायदळी तुडवली जात आहेत. राजकारणापलीकडे असलेले कौटुंबिक नाते तोडले जात आहेत. मुलांच्या हट्टापायी नेत्यांनाही भाजपवासी व्हावे लागत आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.



























































