परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली…, सुप्रिया सुळे यांची संभाजी भिडेंवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असला, ‘‘तुझ्या कपाळाला टिकली नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही,’’ असे वक्तव्य करून संभाजी भिडे यांनी पुन्हा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरातील महिला त्यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संभाजी भिडेंवर टीका केली आहे. त्यांनी फेसबुकवर एक उपहासात्मक कविता पोस्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी कवी हेरंब कुलकर्णी यांची एक कविता पोस्ट केली आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यावर पत्रकारांनी संभाजी भिडे यांना घेरले. यामध्ये महिला पत्रकारांचाही समावेश होता. या भेटीबद्दल महिला पत्रकाराने विचारले असता, संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराकडे पाहिले आणि तुझ्या डोक्याला टिकली नाही. म्हणून प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगितले. येवढेच नाही तर आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमाते समान असते. तू कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलेन, असा सल्लाही त्यांनी महिला पत्रकाराला दिला. दरम्यान आपण लोकशाही असलेल्या देशात राहतोय़  टिकली लावावी की लावू नये हा माझा अधिकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रया या महिला पत्रकाराने व्यक्त केली.

महिला आयोगाने बजावली नोटीस

तू टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही, असे सांगत महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांचा निषेध आहे. या आधीही महिलांना हीन समजणारी वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत. त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाचे मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, अशी नोटीस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या.