मंदीमुळे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर – सुप्रिया सुळे 

552

भाजपा सरकारच्या कार्यकाळात तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध उपलब्ध झाली नाही़ त्याचा परिणाम बेरोजगारी वाढली. त्यातच लादलेली जीएसटी आणि याच सरकारच्या चुकलेल्या आर्थिक नियोजनाच्या गणितामुळे देशाला मोठ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे. याचा मोठा फटका सुशिक्षित बेरोजगारांना बसला आहे. हाच प्रश्न गंभीर बनला आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधणे आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना कितपत फायदा झाला, शिवाय यशोगाथा जाणून घेण्याच्या उद्देशाने खासदार सुप्रिया सुळे राज्यभर दौरा करीत आहेत. हिंगोली, परभणी दौरा आटोपून त्यांचे आज बुधवारी संभाजीनगरात आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्र सरकारचे आर्थिक गणित चुकत आहे. त्याचा पहिला फटका सुशिक्षित बेरोजगारांना बसला आहे़ मंदीमुळे विविध कंपन्यांत नोकर कपात केली जात आहे. त्यामुळेच बेरोजगारांच्या संख्येत सुशिक्षित बेरोजगारांची भर पडत आहे. असे असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, असा आरोप करीत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, वाहन उद्योग अडचणीत येण्यास ओला आणि उबर कंपन्या कारणीभूत आहेत असे वक्तव्य करणे जबाबदार मंत्र्यांनी करणे चूकच आहे. 72 वर्षांत पहिल्यांदाच अशा महामंदीला देशाला सामोरे जावे लागत आहे, असेही त्या म्हणाल्या.

जनतेशी संवाद साधण्याच्या उद्देशाने राज्यभर दौरा करीत आहे़ या दौऱ्यात एकीकडे महापूर तर दुसरीकडी भीषण दुष्काळी परिस्थिती अशा कठीण प्रसंगी राज्य आणि केंद्र सरकारने त्यावर तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यातच हे सरकार अपयशी ठरले आहे. याबाबतीत आम्ही विरोधक म्हणून टीका करतो़ त्यावर उपाय म्हणून काही सूचना करतो, मात्र सरकार त्या सूचना स्वीकारत नाही, असा आरोपही त्यांनी केला. हेच प्रश्न आणि विकासचे मुद्दे घेऊन आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘त्या’चोरांच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूक काळात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही ‘अलीबाबा चाळीस चोरां’ची पार्टी असे वक्तव्य केले होते, याचा उल्लेख करून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य खरे असेल तर या मंडळींचे भाजपामध्ये इनकमिंग कसे? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांचे त्यावेळचे वक्तव्य खोटे होते, हे तर मान्य करावे, असेही त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या