
कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या पाच विभागात मिळून तब्बल 255 मराठी शाळा बंद पडल्या आहेत, अशी कबुली खुद्द सरकारनेच लेखी उत्तरात विधान परिषदेत दिली. शासनाने 2025मध्ये 620 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून 70 गावांत ना शाळा, ना पेन्सिल अशी परिस्थिती आहे.
आज जगभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत एक खंत व्यक्त केली आहे. ”जर मराठी शाळाच राहिल्या नाहीत तर आपण भविष्यात मराठी भाषा गौरव दिन काय साजरा करणार…? अशी खंत त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केली.
”ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करीत आहोत. केंद्र सरकारने मराठीला ‘अभिजात भाषा’ दर्जा बहाल केला, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. दुसरीकडे मात्र राज्यातील मराठी माध्यमाच्या सुमारे २५५ शाळा बंद पडल्याची माहिती स्वतः मंत्री महोदयांनी विधिमंडळात दिली. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढत असल्याने या शाळांवर ही स्थिती ओढावली. थोडक्यात मराठी भाषेतून आपल्या मुलांना शिक्षण घ्यावे की नको याबाबत पालक साशंक दिसतात. आपल्या मातृभाषेच्या बाबतीत निर्माण झालेली ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. म्हणूनच मराठी शाळांची गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा याबाबत नव्या दृष्टिकोनातून विचार करुन मराठी शाळा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकारने भाषेचा विकास आणि प्रसारासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हा निधी उपलब्ध असेल, तर तो प्राधान्याने मराठी शाळांचे बळकटीकरण, आधुनिक सुविधा आणि गुणवत्तावृद्धीसाठी वापरणे आवश्यक आहे. भाषेचे जतन आणि संवर्धन याची खरी सुरुवात शाळांमधूनच होते. आणि जर मराठी शाळाच राहिल्या नाहीत तर आपण भविष्यात मराठी भाषा गौरव दिन काय साजरा करणार…?”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.



























































