स्वतःच्या रक्ताबरोबर राजकीय व्यभिचार करणाऱ्यांनी बोलू नये – सुरेश धस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आष्टी

ज्यांनी स्वतःच्या रक्ताबरोबर राजकीय व्यभिचार केला त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, असा घणाघात आमदार सुरेश धस यांनी केला आहे. जिल्हा बँकेचे 22 कोटी रुपये भरा आणि मगच पांढरे कपडे घालून जिल्ह्यात नाक उचलून कार्यक्रमांना हजेरी लावा, चोर तर चोर आणि वर शिरजोर अशी अवस्था विरोधी पक्षनेत्यांची झाली आहे, अशी बोचरी टीका विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.

बीड, लातूर, धाराशिव स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पैशाला आम्ही कमी पडलो, असे मुंडे म्हणतात. मात्र, त्यांच्या पक्षाचे नेते रमेश कराडांची परिस्थिती चांगली नसल्याने जगदाळे यांनात उमेदवारी दिल्याचे सांगतात. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय नेते खोटे बोलत आहेत की धनंजय मुंडे खोटे बोलत आहेत, असा प्रश्न आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे. तसेच सूत गिरणीच्या पैशाबाबत मला नोटीस न देता निर्णय घेतल्याचा कांगावा करून मुंडे लोकांची दिशाभूल करत असल्याचेही धस यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना विरोधी पक्षनेते स्वतःच्या मतदारसंघात नट-नट्यांना आणून गणेशोत्सवात कहोना प्यार है करीत आहेत असा टोला लगावत, आमच्यावर आरोप करताना ते सिद्ध होतील असेच बोलावे अन्यथा त्यांची सर्व पाळेमुळे मला माहीत आहेत, असा इशारा आमदार धस यांनी दिला आहे.