
सुरेश रैनाने शनिवारी यंदाच्या मोसमात आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आणि हिंदुस्थानकडे प्रयाण केले. त्यावेळी वैयक्तिक कारणामुळे सुरेश रैनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पण आता वेगळीच माहिती मीडियासमोर येत आहे. सुरेश रैनाला कर्णधार, प्रशिक्षक व व्यवस्थापकांना दिलेली हॉटेलमधील रूम हवी होती. या रूमला बाल्कनी होती. पण इतर खेळाडूंना देण्यात येणारी रूम सुरेश रैनाला देण्यात आल्यामुळे त्याने स्पर्धा सोडून तडकाफडकी मायदेशात येण्याचा निर्णय घेतला आहे. आता यामुळे चेन्नई सुपरकिंग्जचे व्यवस्थापन सुरेश रैनाच्या या वागणुकीवर कमालीचे नाराज झाले असून पुढील मोसमात या घटनेचे पडसाद उमटण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. आयपीएलच्या 2021च्या मोसमासाठी त्याला चेन्नई सुपरकिंग्ज संघाबाहेर काढण्यात येऊ शकते.
खरं कारण कोणते…
सुरेश रैनाच्या कुटुंबातील एका सदस्याची हत्या झाली त्यामुळे त्याने मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली होती. त्यानंतर दुबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागलीय यामुळे तो घाबरला होता, असे वृत्तही मीडियामधून पुढे आले होते. आता रूमला बाल्कनी नसल्यामुळे तो चेन्नई सुपरकिंग्जच्या संघ व्यवस्थापनावर नाराज होता असे सांगण्यात आले आहे. नेमके खरे कारण कोणते याबाबत अधिकृत कोणाकडूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
यशाची धुंदी चढलीय; 11 कोटींना मुकावे लागणार
याप्रसंगी चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाले, आयपीएलचा मोसम अजून सुरूही झालेला नाही. सुरेश रैनाने काय गमावले आहे ते त्याला पुढे समजेलच. एका मोसमासाठी त्याला 11 कोटी रुपये मिळतात. हे त्याला गमवावे लागणार आहेत. जेव्हा एखादा खेळाडू एका गोष्टीवर अडून राहतो त्याला मी काहीच करू शकत नाही. तो संघ सोडून जाऊ शकतो. काही खेळाडूंच्या डोक्यामध्ये यशाची हवा जाते, असे परखड मतही पुढे त्यांनी व्यक्त केले.



























































