
‘का रे दुरावा’, ‘एक घर मंतरलेलं’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सुरुची आडारकर आता मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. तिच्या आगामी ‘ए फक्त तूच’ या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच लाँच झाले आहे. समुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फूल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. ‘कारण आपलं नातं वेगळं आहे…’ ही चित्रपटाची टॅगलाइन आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पाहायला मिळेल असा अंदाज टीजर पोस्टरवरून करता येतो. जयदीप फिल्म प्रॉडक्शन निर्मित आणि रंगनाथ पाचंगे दिग्दर्शित या चित्रपटात सुरुचीसोबत चिन्मय उद्गीरकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्पे, ऋषिकेश वाम्बुरकर, गीत निखारगे यांच्याही भूमिका आहेत. नोव्हेंबरमध्ये शूटिंगला सुरुवात होणार आहे.



























































