रवींद्र नाटय़ मंदिरात 27, 28 मार्चला रंगणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ यंदा 27 आणि 28 मार्च रोजी रवींद्र नाटय़ मंदिरात होणार आहे. लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. संमेलनात दोन दिवस दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतींचा जागर होणार आहे.

स्वामिराज प्रकाशन आयोजित या संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते होणार असून नगरसेवक किरण तावडे हे स्वागताध्यक्ष आहेत. समारोप सोहळय़ाचे अध्यक्षस्थान मराठी भाषा मंत्री उदय सामंत भूषविणार आहेत. संमेलनात सुर्वे मास्तरांच्या कविता आणि गिरणगाव यावर सांगोपांग चर्चा होणार आहे.

अशोक नायगावकर, महेश केळुसकर, अशोक बागवे, संतोष पवार, बजरंग चव्हाण, कपिल भोपटकर, सुभाष नकाशे, हेमंत भालेकर, जयेंद्र साळगावकर, दिनेश केळुसकर, अभिनेता स्वप्नील राजशेखर, दिग्दर्शक विवेक देशपांडे आदी संमेलनात सहभागी होणार आहेत. यावेळी गिरणगावातील कवींचेही संमेलन होईल. मास्तरांच्या कवितांवरील ‘चंद्रा’ आणि ‘आमच्या या घरात’ या नाटकांचे अभिवाचन होणार आहे. ‘ढाकुमाकुम टाकुमाकुम’ या सांगीतिक कार्यक्रमाने सांगता होईल.

संमेलनात नाटककार के. राघवकुमार, कथाकार काशीनाथ माटल यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. ‘गांधी टॉक्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक किशोर बेळेकर यांचाही खास सन्मान करण्यात येणार आहे.