सुशीलकुमार शिंदे, सलीम मुल्ला यांना साहित्य अकादमी पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

युवा साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, मराठी भाषेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहाला पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ‘जंगल खजिन्याचा शोध’ या सलीम सरदार मुल्ला यांच्या कादंबरीस बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशातील विविध 24 प्रादेशिक भाषांमधील युवा साहित्यिकांना पुरस्कार देण्यात येतात. मराठी भाषेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहाला पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे जिल्हय़ातील इंदापूर येथील शिंदे यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशन इन्स्टिटय़ूटमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे.

वनसंरक्षक लेखक

हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोधात’ या बालकादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. मुल्ला यांनी वनविभागात वनसंरक्षक म्हणून काम केले आहे. जंगलातील औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या बालचमूचे प्रभावी चित्रण मुल्ला यांनी या कादंबरीत केले आहे.