उरणमध्ये पुलाच्या भिंतीवर संशयास्पद मजकूर, पोलीस यंत्रणा सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या एका खांबावरील भिंतीवर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मजकुरामध्ये इसिस तसेच दहशतवादी अबू बकर अल बगदादीचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाच गांभीर्य वाढले आहे. खोपटे पुलाच्या खांबाच्या भिंतीवर हा संशयास्पद मजकूर लिहिला आहे. रविवार या बाबत उरण पोलिसांना या बाबतची माहिती मिळाल्यानंतर या बाबत चौकशी आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

उरण तालुक्यात ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी, विद्युत केंद्र या सारखे संवेदनशील व महत्वाचे प्रकल्प असल्याने या संदेशाला महत्व प्राप्त झाले आहे. काळ्या रंगाच्या मार्करने तिन भागात हे संदेश लिहिले आहेत. तसेच या संदेशामध्ये धोनी जन्नत मे आऊट, आम आदमी पार्टी, केजरीवाल या सारखी सांकेतिक नावांचा उल्लेख आहे. तसेच दहशतवादी हाफिज सईद, रहिम कटोरी, राम कटोरी यांचा उल्लेख करण्यात आला असून देवनागरी व इंग्रजीमध्ये सांकेतिक भाषेत आकडे लिहिले आहेत. तसेच येथे एक आकृती काढली असून त्यामध्ये इंम्पोर्ट, एक्सपोर्ट जहाज पोर्ट (जेएनपीटी), एअर पोर्ट, गॅस पेट्रोल दाखविण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला गोरखपूर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी हे संदेश लिहिले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. हस्ताक्षरावरून आणि भाषेवरून तरी हा मजकूर कोणी स्थानिकांनी लिहिला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या बाबत सगळ्या शक्यता तपासून पाहत असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचे उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अतुल अहेर यांनी सांगितले आहे.