निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची दहा तास चौकशी

मुंढव्यातील कोटय़वधी रुपयांच्या शासकीय जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याची आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी तब्बल दहा तास चौकशी केली. दिवसभर सुरू असलेल्या या चौकशीनंतर त्यांचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला. मात्र, चौकशीत येवले याने नेमकी कोणती माहिती दिली याबाबत पोलिसांनी मौन पाळले.

चौकशीदरम्यान या प्रकरणातील अटकेत असलेली शीतल तेजवाणी हिला देखील यावेळी हजर करण्यात आले. दोघांची समोरासमोर चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेजवाणी सध्या पोलिस कोठडीत असून तिची कोठडीची मुदत उद्या (गुरुवारी) संपत असल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे येवले यांच्या चौकशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत येवले याची कसून चौकशी केली. या प्रकरणातील महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी, निर्णयप्रक्रिया, जमीन वर्गीकरणाशी संबंधित मुद्दे आणि संबंधित व्यक्तींसोबतचे संबंध यावर विस्तृत विचारपूस करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार संबंधित अमेडिया पंपनीचे संचालक दिग्वीजय पाटील, शीतल तेजवाणी, निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवले आणि इतरांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.