वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

मेंदडी कोंड गावात एका वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महादेव कांबळे (95) व विठाबाई कांबळे (83) असे त्यांचे नाव आहे. त्या दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून म्हसळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

1 नोव्हेंबर रोजी कांबळे कुटुंबीयांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्यांना त्या दोघांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने नमुने गोळा केले आहेत.