जलतरणातील ‘कुशाग्र’

289

>> जयेंद्र लोंढे

क्रिकेट हा खेळ तमाम हिंदुस्थानींचा श्वास. पण अभिनव बिंद्रा, मेरी कोम, विजेंदर सिंग, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे नेमबाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, कुस्ती या खेळांमध्ये हिंदुस्थान प्रगतिपथावर रूढ झालाय. याच पार्श्वभूमीवर जलतरण या खेळामध्ये हिंदुस्थान मागे कसा, असा प्रश्न तमाम क्रीडाप्रेमींना पडणे साहजिकच आहे. यावेळी आशियाई जलतरण चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 15 सुवर्ण पदकांसह एकूण 52 पदकांची लयलूट केली आणि जलतरण या खेळामध्ये हिंदुस्थान पुढे पाऊल टाकत आहे याची झलक दाखवून दिली. याप्रसंगी 19 वर्षी कुशाग्र रावत या युवकाने पाच सुवर्ण पदके जिंकत सर्वोत्तम जलतरणपटूचे बक्षीसही पटकावले. यावेळी दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना त्याने ऑलिम्पिक पदक पटकावण्याचे ध्येय उराशी बाळगल्याचेही आवर्जून सांगितले.

आशियाई स्पर्धेत पाच सुवर्ण पदके जिंकलीस. या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करशील असे वाटले होते का?
– आशियाई स्पर्धेत माझ्याकडून चांगली कामगिरी होईल याची कल्पना होती. कारण स्पर्धेपूर्वी छान तयारी झाली होती. पण पाच गोल्ड मेडल्स मिळतील असे वाटले नव्हते. या घवघवीत यशानंतर आनंद होणे साहजिकच आहे, मात्र त्यानंतर अद्याप कोणाकडूनही कौतुक झालेले नाही. या स्पर्धेत जिंकलेल्या एकाही खेळाडूला गौरवण्यात आलेले नाही. पुढे कदाचित सन्मानित करण्यात येऊ शकते.

जलतरणाची सुरुवात कशी झाली?
– मला लहानपणी दमा होता. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांनी जलतरणासाठी पाठवले. मात्र वयाच्या 13 व्या वर्षापासून प्रोफेशनल स्वीमिंगकडे पावले वळली. तिथपासून आतापर्यंत दिनेश कुमार, पार्था मुझुमदार आणि एडना शर्मा यांच्या मार्गदर्शनात जलतरणाचे कसब आत्मसात केले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीबाबत सांग…
– 2016 साली श्रीलंकेत झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड मेडल्स व एक सिल्व्हर मेडल जिंकण्यात यश लाभले. त्यानंतर 2017 साली उझबेकिस्तान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दोन सिल्व्हर व दोन ब्राँझ पदके पटकावली. तसेच वर्ल्ड युनिव्हर्सिटी व फिना जागतिक चॅम्पियनशिपमध्येही हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आणि आता आशियाई स्पर्धेत पाच गोल्ड मेडल्स जिंकता आले आहेत.

शिक्षण व खेळ हे एकाच वेळी करीत असताना अडचण निर्माण होत असेल ना?
– जलतरणात मला करीअर करायचे आहे. सध्या शिक्षणही सुरू आहे. पण दोन्हींवर लक्ष देत पुढे जात आहे. सध्या दिल्ली युनिव्हर्सिटीतील श्रीराम कॉलेजमधून इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेत आहे.

हिंदुस्थानात क्रिकेट या खेळासह सध्या बॅडमिंटन, फुटबॉल, कबड्डी यांसारख्या खेळांचे वारे वाहू लागले असताना तू जलतरणाकडे वळलास. याबद्दल काय सांगशील…
– स्वीमिंग हा वैयक्तिक खेळ आहे. या खेळातील यश हे तुमच्या कामगिरीवर अवलंबून असते. वडिलांनीही हेच समजावून सांगितले. इतर सांघिक खेळांमध्ये राजकारणही खूप असते. तसेच सांघिक खेळामध्ये सर्वांच्या कामगिरीवरच सर्वकाही अवलंबून असते. त्यामुळे जलतरणात करीअर करण्याचा निर्णय घेतला.

हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरणात मागे आहे याबद्दल तुला काय वाटते?
– आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरणात हिंदुस्थानला मोठी कामगिरी करता आलेली नाही हे मान्य आहे, पण हळूवारपणे पुढे सरकतोय. देशातील खेळाडूंच्या टायमिंगमध्ये कमालीची सुधारणा होतेय. भविष्यात या खेळामध्ये हिंदुस्थानी खेळाडू नक्कीच चमकतील याचा मला विश्वास आहे.

हिंदुस्थानात या खेळाच्या प्रगतीसाठी कोणत्या सुधारणा होणे अपेक्षित आहे?
– हिंदुस्थानातील अव्वल खेळाडूंसाठी एक सेंटर बनवायला हवे. त्यामध्ये हे सर्व जलतरणपटू कसून सराव करू शकतील. तसेच एकमेकांसोबत सराव करीत पुढे जाण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.

दैनंदिन सरावाचे वेळापत्रक कसे असते?
– पहाटे 5.15 वाजता जलतरणाच्या सरावाला सुरुवात होते. 7.30पर्यंत हा सराव सुरू असतो. त्यानंतर सकाळी 8.15 वाजता घरी येतो. ब्रेकफास्ट करून कॉलेजला जातो. कॉलेजमध्ये सर्व लेक्चर अटेंड करीत नाही. घरीच अभ्यास करतो. सायंकाळी 4 ते 6.30 यावेळेत पुन्हा सराव केला जातो.

जलतरणातील आदर्श कोण?
– अमेरिकेचा मायकेल फेल्प्स व ऑस्ट्रेलियाचा मॅक हॉटन. दे दोन्ही खेळाडू प्रचंड आवडतात. मॅट हॉटन याचे व्हिडीओ पाहून जलतरणात यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. मायकेल फेल्प्स हा तर लिजंड आहे. सर्व गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत.

पुढचे ध्येय कोणते?
– ऑलिम्पिकमध्ये देशाला गोल्ड मेडल जिंकून द्यायचे आहे. 400 व 800 मीटर फ्रीस्टाइलमध्ये जबरदस्त कामगिरी करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये सॅफ चॅम्पियनशिप आहे. त्यानंतर जून महिन्यातही स्पर्धा आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी जिवाचे रान करीन.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या