नगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा फैलाव; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. जानेवारी 2019 पासून जिल्ह्यात जवळपास 50 जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. या काळात आरोग्य विभागाने एकूण 95 हजार नागरिकांची तपासणी केली होती. त्यात स्वाइन फ्लूचे 50 रुग्ण आढळून आले होते.

जिल्ह्यात साथरोग, कीटकजन्य आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. तसेच ’स्वाइन फ्लू’चाही फैलाव होत आहे. साथींच्या आजारासह स्वाइन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे रुग्णांमध्ये दिसल्यास त्यास तत्काळ औषधोपचार केले जात आहेत. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून एकूण 95 हजार 578 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 50 जणांना स्वाइन फ्लू असल्याचे दिसून आले. अकोलेमध्ये 6, नगरमध्ये 3, कोपरगावमध्ये 4, पारनेरमध्ये 3, राहातामध्ये 7, राहुरीत 4, शेवगावमध्ये 2, संगमनेरमध्ये 20, श्रीरामपूरमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

स्वाइन फ्लूचा विषाणू हवेतून वेगाने पसरतो. शिंकताना हातरुमालाचा वापर करणे, हात स्वच्छ धुण्याची सवय लावणे, कुठेही थुंकणे टाळण्याबरोबरच धूम्रपानामुळे शरीराची प्रतिकार शक्ती कमी होत असल्याने धूम्रपान टाळणेही महत्त्वाचे आहे. दमा, कॅन्सर, किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना स्वाइन फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. याबाबत नागरिकांत जनजागृती केली जात असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्याच्या उत्तर भागात रुग्णांची संख्या जास्त आहे. एकट्या संगमनेर तालुक्यातच 20 रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त राहुरी, राहाता, कोपरगाव तालुक्यांतही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत.
सरकारी दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांच्या लाळ किंवा थुंकीची तपासणी सरकारी प्रयोगशाळांमध्ये केली जाते. खासगी दवाखान्यातील रुग्णांचे स्वॅब सरकारने परवानगी दिलेल्या खासगी प्रयोगशाळेत तपासले जातात. खासगी दवाखान्यातील रुग्णांची माहिती सरकारी यंत्रणांना देणे अपेक्षित असले तरी माहिती कळवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यातील रुग्णांची माहिती सरकारी वैद्यकीय अधिकार्‍यांना होत नाही. माहितीतही तफावत असल्याचे दिसून येते. खासगी प्रयोगशाळेतील तपासण्याही महागड्या असतात. सरकारी प्रयोगशाळेतील तपासणी मात्र मोफत होते.